सिंधुदुर्ग - जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या हालचालींनी वेग घेतला असताना आता बँकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने राजकीय घडामोडी ही गतिमान होऊ लागल्या आहेत. मंगळवारी आमदार वैभव नाईक यांनी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांची पाठराखण केल्यानंतर बुधवारी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी देखील कणकवलीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत जिल्हा बँक राजकीय अड्डा बनला असल्याचे म्हटले आहे.
बँकेने नितेश राणेंना पाठवली होती नोटीस -
12 बोलेरो गाड्यांसह आमदार नितेश राणे यांच्या ताफ्यातील इनोव्हा कारच्या थकीत कर्ज प्रकरणी जिल्हा बँकेने 101 ची नोटीस पाठवली होती. यावर बोलताना राजन तेली यांनी सर्वसामान्यांची बँक असलेल्या जिल्हा बँकेचा राजकीय अड्डा बनवला जात असल्याचा आरोप केला आहे. कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
जिल्हा बँक ही काही त्यांची मालकी नाही. ती जिल्ह्यातील सर्वसामान्य ठेवीदारांची आहे. त्यामुळे तुम्ही असा आव आणू नका की आम्हीच सांभाळली आहे. शिवरामभाऊ जाधव, ढोलम यांच्यासारख्यांच्या पुण्याईने सुरू झालेली ती बँक आहे. ती चांगली राहिली पाहिजे हे आमचे धोरण आहे. मात्र मी सर्व पुरावे हातात घेऊनच बोलणार आहे. कर्ज देणे हा बँकेचा व्यवसाय आहे आणि जे कर्ज थकवतात त्यांच्यावर कारवाई करणे हे काम आहे. मात्र, त्याचा गवगवा करणे हे योग्य नाही. रवींद्र चव्हाण हे बँकेतील बेकायदा भरतीबाबत बोलले आहेत. त्यांनी बँकेच्या कामकाजाबाबत काहीही तक्रार केलेली नाही, असेही तेली यावेळी म्हणाले.
हेही वाचा -"मुंबईतले उद्योग पळवून नेऊ, असे कोणाला वाटत असेल तर ते कोणाच्या बापाला शक्य नाही"
हेही वाचा - शेगाव-अकोट रोडवर कापसाने भरलेल्या ट्रकची दुचाकीला धडक; तिघांचा मृत्यू, दोन गंभीर