सिंधुदुर्ग - कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्र किनारी आता पर्यटक दाखल होऊ लागले आहेत. सद्या म्हणावी तशी पर्यटकांची वर्दळ नसली, तरी येणाऱ्या पर्यटकांमुळे व्यावसायिकही सुखावल्याचे दिसून येत आहे. कोरोना काळात जिल्ह्याच्या किनारपट्टीवर चांगलाच शुकशुकाट होता. त्यामुळे येथील पर्यटन व्यवसायावरही मोठा परिणाम झाला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचे नुकसान त्यात पर्यटन व्यवसाय अडचणीत आल्याने जिल्ह्याची अर्थव्यवस्था पुरती कोलमडली आहे. दरम्यान आता पर्यटक दाखल होऊ लागले आहेत.
गेल्या आठ महिन्यांपासून पूर्ण देश लॉकडाऊनमध्ये होता. त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले होते. मात्र, आता ८ महिन्यानंतर नंतर परिस्थिती सुधारत आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यावर पर्यटक आनंद घेण्यासाठी येताना दिसत आहेत. शिरोडा वेळागर किनाऱ्यावर पण लोकांची गर्दी वाढू लागली आहे. पर्यटन व्यवसाय कोरोना काळात पूर्णपणे संकटात सापडला आहे. यात हॉटेल व्यावसायिक आर्थिक संकटात सापडला आहे, पण आता व्यवसाय हळूहळू सुरू होत आहे. प्रशासकीय नियम शिथिल होत असल्याने पर्यटक समुद्र किनाऱ्यावर वर्दळ करू लागले आहेत.