सिंधुदुर्ग- सही रे सही फेम मालवणी नाट्य अभिनेत्री गीतांजली लवराज कांबळी यांचे आज (शनिवारी ) निधन झाले. त्यांना कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराने ग्रासले होते. त्यांच्यावर मुंबईत चर्नीरोड येथील सेफी हॉस्पिटल मध्ये डॉक्टर अनिल संगरिया हे उपचार करीत होते. अखेर त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. आज (शनिवारी ) पहाटे त्यांचे मुंबई येथे उपचारादरम्यान निधन झाले.
गीतांजली कांबळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील मुळ रहिवासी. मात्र त्या व्यवसायासाठी मुंबई येथे राहत असत. सही रे सही या नाटकात अभिनेते भरत जाधव यांच्या बरोबर गीतांजली कांबळी यांनी केलेला अभिनय आजही प्रेक्षकांच्या नजरेसमोर आहे. त्यांची झी वाहिनी वरिल कुंकू मालिकाही गाजली होती. त्यांनी बकुळा नामदेव घोटाळे, टाटा बिर्ला आणि लैला व गलगले निघाले, या सिनेमांमध्ये काम केले. तसेच मालवणी नटसम्राट मच्छिंद्र कांबळी यांच्या वस्त्रहरण नाटकात त्यांनी केलेल्या कामाला नाट्यरसिक दाद देत असत.
गीतांजली यांनी 50 पेक्षा जास्त व्यावसायिक नाटकांमध्ये काम केले आहे. त्याचबरोबर पती लवराज कांबळी यांच्या नाटकांमध्ये त्यांनी अनेक भूमिका साकारल्या होत्या. गीतांजली यांच्या जीवनावर बायको खंबीर नवरो गंभीर मालवणी नाटक लवराज यांनी निर्मित केले आहे.
गीतांजली यांनी 2012 पासुन कॅन्सरसारख्या दुर्धर आजारावर मात करत अनेक नाटक, सिनेमा व मालिकांमधून आपल्या भूमिका बजावल्या आहेत. त्यांच्यावर आतापर्यंत 40 केमो झाले आहेत. परंतु पुन्हा एकदा त्यांना याच आजाराने ग्रासले आणि आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.