सिंधुदुर्ग - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने आचरा व्यापाऱयांनी रविवारी आठवडा बाजारा दिवशी आपली दुकाने बंद ठेवून कडकडीत बंद पाळला. त्यामुळे दशक्रोशीची बाजारपेठ असलेल्या आचरा बाजारपेठेत शुकशुकाट पसरला होता. संचारबंदी असलेल्या १७ तारीखेपर्यंतचे पुढील दोन्ही बाजार बंद ठेवण्यात येणार आहेत.
शासनाने ग्रामिण भागातील व्यवहार पुर्ववत सुरू करण्यास परवानगी दिली होती. त्यानंतर मागील गुरुवारच्या आठवडा बाजार दिवशी बाजारात उसळलेल्या गर्दीमुळे सोशल डिस्टन्सचा बोजवारा उडाला होता. रेड झोनमधून येणाऱयांचे प्रमाण वाढत असताना आठवडा बाजाराला होणारी गर्दी कोरोना वाढण्यासाठी व्यापारी बांधव व आचरा गावच्या सुरक्षेला धोकादायक ठरू शकते. या गोष्टींचा विचार करून आचरा आपत्कालीन समिती व व्यापारी संघटना आचरा यांच्या सहकार्याने रविवार १७ मे पर्यंतचे दोन रविवार आणि गुरुवार असे तीन आठवडा बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
या दृष्टीने रविवारचा आठवडा बाजार व्यापारी बांधवांनी कडकडीत बंद ठेवला होता. केवळ काही वेळेपुरतेच लोकांची गैरसोय होऊ नये याची खबरदारी घेत मेडिकल स्टोअर्सवालेही सहभागी झाले होते. या बंदला ग्राहकांनी, आचरा ग्रामस्थांनी सहकार्य देत बाजारात येण्याचे टाळल्याने रस्त्यांवर शुकशुकाट पसरला होता. आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचाऱ्यांनीही सुरक्षेच्या कारणामुळे आचरा तिठ्यावर चोख बंदोबस्त ठेवला होता. आर्थिक नुकसान सोसत आचरा व्यापारी बांधवांनी आपल्या गावाच्या सुरक्षेला महत्त्व देत आठवडा बाजार दिवशीच आपले व्यवसाय बंद ठेवल्याने व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अर्जुन बापर्डेकर, जिल्हा परिषद सदस्य जेरॉन फर्नांडिस, सरपंच प्रणया टेमकर यांनी त्यांच्या या योगदानाचे कौतूक केले आहे.