सिंधुदुर्ग : शाळा बंद असल्याने मुलांना शालेय जीवनातील आनंदाला मुकावे लागत आहे. एकीकडे शाळा बंद तर दुसरीकडे ऑनलाईन शिक्षणाची सोय. मात्र, ही सुविधा ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नसल्याने मुलांच्या मनामध्ये संकटांचे काहूर माजले आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुलांच्या मनातील या भावनांना वाट मोकळी करून देणारे एक चित्र सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. दारुममधील एका घराच्या भिंतीवरती गवाणेतील युवाचित्रकार अक्षय मेस्त्रीने साकारलेले चित्र आणि त्यातील सामाजिक संदेश म्हणजे शिक्षण व्यवस्थेला आणि शासनाला जाग आणून देणारे लक्षवेधी ठरत आहे.
कोरोनाच्या महाभयंकर संकटामुळे सध्या शाळा बंद असल्याने मुलांचे कधीही भरून न येणारे शैक्षणिक नुकसान होत आहे. १५ जूनपासून शासनाने शिक्षण सुरू केले. मात्र, ऑगस्टमध्येही शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत. मुलांना शाळेच्या कक्षेत गुरुजनांकडून मिळणाऱ्या खऱ्याखुऱ्या ज्ञानाला कोरोनाच्या संकटामुळे मुकावे लागत आहे. घरी अभ्यास होत नाही आणि घराबाहेर जावे तर कोरोनाचे संकट, अशा दुहेरी संकटात विद्यार्थी वर्ग सापडला आहे. अखेर यावरती पर्याय म्हणून शासनाने ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी दिक्षा अॅप, गुगल क्लासरुम सारख्या संकल्पना आणून ऑनलाईन शिक्षण देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पण गावखेड्यातील सर्व मुलांपर्यंत हे शिक्षण खरचं पोहचते आहे का, हा मोठा संशोधनाचा विषय आहे. या शिक्षणाबद्दल विद्यार्थ्यांच्या मनातील खदखद काय आहे, हे युवा चित्रकार अक्षय मेस्त्रीने आपल्या चित्रातून साकारत मुलांच्या मनातील स्पंदणे भिंतीवर रेखाटली आहेत.
निसर्ग मित्र परिवार या निसर्ग व पर्यावरणप्रेमी संस्थेचा सक्रिय सदस्य असलेला आणि आपल्या चित्रकलेच्या माध्यमातून विविध विषयांवरती सामाजिक संदेशातून समाज जागृती आणि प्रबोधन करणाऱ्या देवगड तालुक्यातील गवाणे येथील युवा चित्रकार अक्षय मेस्त्री याने तळेरे-दारुम- नाद मार्गावरील एका घराच्या भिंतीवर काढलेले चित्र सध्या सर्वाचे लक्ष वेधून घेत आहे. सध्या मुलांच्या शाळा बंद आहेत. ऑनलाईनचे धडे सगळ्यांपर्यंत पोचतातच असे नाही. अशावेळी बराच काळ शाळेपासून दूर राहिलेल्या मुलांची व्यथा मला खुणावत होती. तीच मी चित्राच्या माध्यमातून मांडली, असे अक्षय मेस्त्री याने सांगितले.