सिंधुदुर्ग - मालवण तालुक्यातल्या आचार समुद्रातील पाण्यात असलेला कचरा मच्छीमारांच्या जीवावर बेतत आहे. बुधवारी पहाटे साडेसहाच्या सुमारास आसिफ मुजावर आणि इतर खलाशी मासेमारीसाठी समुद्रात जात असताना नस्ताजवळ होडीच्या इंजिनमध्ये कचरा अडकून इंजिन बंद पडले. भर समुद्रात इंजिन बंद पडल्याने लाटांमुळे होडी पलटी होऊन खलाशी पाण्यात फेकले गेले. सुदैवाने किनारपट्टीपासून दिडशे फूटाच्या दरम्यान ही घटना घडल्याने होडीतील सर्व खलाशी सुखरूप पोहत बाहेर आले. नजरेच्या टप्प्यात असलेली होडी स्थानिक मच्छिमारांच्या सहकार्याने बाहेर काढण्यात यश मिळाले आहे.
आचरा समुद्रात बुधवारी पहाटे साडेसहाच्या सुमारास आसिफ मुजावर, जहिर मुजावर हे तुलसी मामा, संदिप बा, राजकुमार मेन यांच्यासह आपली होडी (पात) घेऊन मासेमारीसाठी जात होते. दरम्यान, नस्ताजवळ समुद्रातील प्लॅस्टीक कचरा होडीच्या इंजिनमध्ये अडकून इंजिन बंद पडले. नस्ताजवळील धोकादायक ठिकाणी होडी अडकल्याने समुद्राच्या लाटांच्या माऱ्याने होडी पलटी होऊन त्यातील मच्छिमार पाण्यात फेकले गेले. किनारपट्टीपासून काही अंतरावरच हि घटना घडल्याने होडीतील सर्व खलाशी पोहत सुखरूप किनाऱ्यावर आले. घटनेची माहिती समजताच जिल्हा परिषद सदस्य जेरॉन फर्नांडीस, पोलीस हवालदार अक्षय धेंडे, पोलीस पाटील जगन्नाथ जोशी, विठ्ठल धुरी यांसह स्थानिक मच्छिमारांनी घटनास्थळी धाव घेतली होती. अडीच तीन तासांच्या अथक प्रयत्नाने स्थानिक मच्छिमारांच्या सहकार्याने आसिफ मुजावर यांना होडी बाहेर काढण्यात यश आले. असे असले तरी इंजिन आणि होडीचे मिळून सुमारे दोन लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
आचरा समुद्राचे नस्त धोकादायक
आचरा समुद्रात जिथे खाडी समुद्राला मिळते तो नस्ताचा भाग गाळाने भरून गेला आहे. त्यामुळे हा भाग आधीच धोकादायक बनला असताना आता खाडीच्या पाण्यातून येणारा प्लॅस्टीक आणि इतर कचरा यामुळे यात आणखी भर पडली आहे. या कचऱ्यामुळे समुद्रातील जीवजंतूंनाही धोका निर्माण होत आहे. तसाच मासेमारीसाठी जाणाऱ्या मच्छिमारांनाही त्रासदायक बनला आहे. यामुळे समुद्रात येणारा हा कचरा भविष्यात मोठा त्रासदायक ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.