सिंधुदुर्ग जिल्ह्यात 940 नवे बेड्स उपलब्ध - जिल्हाधिकारी - लॉकडाऊन सिंधुदुर्ग
राज्य शासनाने जे निर्बंध लागू केले आहेत, ते जशाच्या तसे लागू केले आहेत. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतरांना मिनी लॉकडाऊनचे कडक नियम पाळावेच लागतील. त्यात सूट मिळणार नाही. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी जागरुक राहून नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
![सिंधुदुर्ग जिल्ह्यात 940 नवे बेड्स उपलब्ध - जिल्हाधिकारी सिधुदुर्ग](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-11333610-455-11333610-1617900752109.jpg?imwidth=3840)
सिंधुदुर्ग - जिल्ह्यातही आता कोरोना रुग्णसंख्या वाढीमुळे परिस्थिती गंभीर होत चालली आहे. त्यामुळे शासनाने लागू केलेल्या मिनी लॉकडाऊनमध्ये कोणतीही सूट मिळणार नाही. जिल्ह्यातील नागरिकांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. जिल्ह्याबाहेरून येणाऱ्यांना बंदी घातलेली नाही. मात्र, येताना किंवा आल्यावर कोरोना टेस्ट करणे बंधनकारक आहे. जिल्ह्यातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन 940 बेड उपलब्ध करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली आहे.
प्रथमच एका दिवसांत रुग्णसंख्या शंभरीपार
जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सात रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या सहा महिन्यांनंतर पहिल्यांदाच एका दिवसात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा शंभरी पार झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर होत चालली आहे, हे स्पष्ट झाले आहे. ही गंभीर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सर्व नागरिकांनी कोविडच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
लॉकडाऊनचे नियम पाळावेच लागतील
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांनी मिनी लॉकडाऊन लागू करून निर्बंध घातले आहेत. त्यात कसलीही सूट मिळणार नाही, अशा स्पष्ट सूचना व्हीडिओ कॉन्फरन्समध्ये दिल्या आहेत. त्यामुळे राज्य शासनाने जे निर्बंध लागू केले आहेत, ते जशाच्या तसे लागू केले आहेत. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतरांना मिनी लॉकडाऊनचे कडक नियम पाळावेच लागतील. त्यात सूट मिळणार नाही. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी जागरुक राहून नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
जिल्ह्याबाहेरून येणाऱ्यांना बंदी नाही
जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या कोणालाही बंदी घातलेली नाही. मात्र, जिल्ह्यात येताना किंवा जिल्ह्यात आल्यावर प्रत्येकाने कोरोना टेस्ट करणे बंधनकारक आहे. लग्न सभारंभ करताना प्रत्येकाने कोरोना टेस्ट करणे बंधनकारक आहे. तसेच सार्वजनिक वाहतूक सुरू ठेवत असताना त्यांनाही कोरोना टेस्ट करावी लागणार आहे. जिल्हय़ातील सर्व व्यापाऱ्यांनीही कोरोना टेस्ट करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. दिवसा जमावबंदी आणि रात्रीची संचारबंदी आहे. त्याचे पालन करावेच लागणार आहे. मात्र, वाहतूक सेवा सुरुच राहणार आहे.
जिल्ह्यात 940 बेड उपलब्ध
कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याने प्रत्येक तालुक्यात कोविड सेंटर सुरू केले असून जिल्हा रुग्णालयात 287, तर सर्व तालुक्यात 653 मिळून एकूण 940 बेड उपलब्ध आहेत. तसेच जेवणाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. सक्रिय 725 रुग्णांपैकी 345 रुग्ण होमआयसोलेशनमध्ये आहेत, तर 380 रुग्ण जिल्हा रुग्णालयात आयसोलेशन वार्डमध्ये उपचार घेत आहेत. एप्रिल महिन्यात गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि महावीर जयंती आहे. हे सर्व कार्यक्रम व सण साधेपणाने साजरे करावेत. पुष्पहार अर्पण करताना दोन-चार व्यक्तींच्या उपस्थितीमध्ये अर्पण करावा, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
हेही वाचा-संभाजी भिडे म्हणाले- कोरोना अस्तित्वात नाही, जगायचे ते जगतील, मरायचे ते मरतील