सिंधुदुर्ग : मुंबई-गोवा महामार्गावर पत्रादेवी एक्साईज चेकपोस्टवर पेडणे येथील विभागाने महाराष्ट्रात केल्या जाणार्या अवैध दारू वाहतुकीवर मोठी कारवाई केली आहे. गोवा बनावटीच्या ७ लाख ३१ हजारांच्या दारुसह सुमारे १२ लाखांचा ट्रक असा एकूण १९ लाख ३१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. काळोखाचा फायदा घेत चालक जंगलातून फरार होण्यात यशस्वी झाला. मात्र, अल्पवयीन क्लीनर अधिकार्यांच्या हाती सापडला. सदर कारवाई शनिवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. बेकायदा दारू वाहतुकीसाठी वापरलेला ट्रक (एमएच ४८ एवाय ५९१६) ताब्यात घेण्यात आला.
पेडणे पत्रादेवी येथील अबकारी चेकपोस्टवर सातत्यपूर्ण दारू वाहतुकी विरोधात कारवाई केली जाते. शनिवारी पहाटे ३ च्या सुमारास गोव्यातून महाराष्ट्राच्या दिशेने येणारा ट्रक तपासणीसाठी थांबविण्यात आला. तपासणी सुरू असताना काळोखाचा फायदा घेत चालक जंगलात पसार झाला. पळण्याच्या प्रयत्नात असलेल्या अल्पवयीन क्लीनरला पकडण्यात मात्र अधिकार्यांना यश आले. ७ लाख ३१ हजारांच्या दारूसह १२ लाख रुपये किमतीचा ट्रक जप्त करण्यात आला. ही कारवाई सब इन्स्पेक्टर मोहनदास गोवेकर व त्यांच्या पथकाने केली. अधिक तपास सब इन्स्पेक्टर अमोल हरवळकर व विभूती शेट्ये करत आहेत. गेल्या तीन महिन्यात या चेकपोस्टवर झालेली ही तिसरी मोठी दारू तस्कर विरोधी कारवाई आहे.