सिंधुदुर्ग - कलमठ ते खारेपाटण या टप्प्यातील महामार्ग चौपदरीकरणाचा ठेका घेतलेल्या केसीसी बिल्डकॉनच्या कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. तसेच आपल्यावर पिस्तूल रोखत जीवे मारण्याची त्यांनी तक्रार केली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करत कणकवली पोलिसांनी ६ जणांना अटक केली आहे. यातील प्रमुख आरोपी हा स्वाभिमान महिला जिल्हाध्यक्षाचा मुलगा आहे.
जानवली ते कासार्डे तसेच खारेपाटण परिसरात मुंबई-गोवा महामार्गाची दुरवस्था झाली आहे. महामार्ग सुस्थितीत आणण्यासाठी ठेकेदाराकडून उपाययोजना केल्या जात नसल्याचा राग मनात धरून कासार्डे परिसरातील काहींनी शुक्रवारी रात्री ठेकेदार, केसीसी बिल्डकॉन कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केली. तसेच त्यांच्यावर पिस्तूल रोखत जीवे मारण्याची धमकीही दिली. यानंतर शनिवारी सकाळी मारहाण झालेल्या कर्मचाऱ्यांनी कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. ठेकेदार कंपनीचे अधिकारी आदित्य सिंग यांच्या फिर्यादीनुसार पोलिसांकडून स्वाभिमान महिला जिल्हाध्यक्षाचा मुलगा सनी पाताडेसह त्याच्या साथीदारांवर विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी ६ आरोपींना अटक केली असून आणखी एक आरोपी प्रेषित महाडिक जखमी असल्याने त्याला अटक केलेले नाही. दरम्यान, प्रेषित महाडिक याने दिलेल्या उलट तपासणीनुसार केसीसी कंपनीच्या कर्मचाऱ्यांवरही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये प्रथमेश उर्फ सनी रणजित पाताडे, शाहू राठोड, प्रणय देवरुखकर, अजिंक्य रणजित पाताडे, राहुल राठोड, अनिल साळकर यांचा समावेश आहे. दरम्यान, हल्ला करणारे सर्व संशयित आरोपी स्वाभिमानाचे कार्यकर्ते असल्याचे बोलले जात आहे.
कणकवलीत ४ जुलै रोजी नितेश राणे आणि स्वाभिमान कार्यकर्त्यांकडून अभियंत्यावर चिखलफेक करण्यात आली होती. त्यानंतर कणकवली शहरातील महामार्गाचे भर पावसात डांबरीकरण करण्यात आले आणि महामार्ग सुस्थितीत आणण्यात आला. मात्र, केसीसी बिल्डकॉन च्या अखत्यारित येत असलेल्या महामार्गापैकी जाणवली, कासार्डे, नांदगाव या भागात महामार्ग खड्डेमय आणि चिखलमय झाला आहे.