सिंधुदुर्ग - कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही तिसरी लाट लहान मुलांसाठी घातक असणार आहे. त्यामुळे पुढील धोका लक्षात घेता, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पन्नास खाटांचे कोविड रुग्णालय सुरू करणार असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. तसेच त्याठिकाणी दाखल होणाऱ्या मुलांना अत्यंत चांगल्या पद्धतीने घरासारखे उपचार करण्यात येतील, असा विश्वासही व्यक्त केला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
दरम्यान, प्लाझ्मा थेरपीचे मशीन जिल्ह्यासाठी देण्यात यावे, अशी मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर २५ लाख रुपयांची तरतूद या मशीनसाठी करण्यात आलेली आहे. आता या थेरपीबाबत मतमतांतरे असली तरी त्याचा फायदा भविष्यात नक्कीच जिल्ह्यातील रुग्णांना होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जिल्ह्यातील जनतेचा लाॅकडाऊनला प्रतिसाद -
यावेळी उदय सामंत म्हणाले, जिल्ह्यातील जनतेने लाॅकडाऊनला प्रतिसाद दिला. त्याचा फायदा जिल्ह्यातील रुग्ण कमी होण्यास होत आहे. त्यामुळे निश्चितच वाढलेली संख्या भविष्यात कमी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जिल्हा प्रशासनाच्या वतीने “माझे सिंधुदुर्ग, माझी जबाबदारी”, अशी मोहीम राबवण्यात आली होती. या मोहिमेअंतर्गत २ लाख ९० हजार १२ लोकांपर्यंत जाऊन त्यांची तपासणी करण्यात आली. त्यात ५६ हजार लोक कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे त्याचा फायदा झालेला आहे. ही मोहीम आतापर्यंत ४० टक्के पूर्ण झाली आहे. ६० टक्के लोकांपर्यंत पोहोचण्याचे काम सुरू आहे, असे त्यांनी सांगितले. लवकरच याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहेत. त्या दृष्टीने संबंधित प्रशासनाला सूचना देण्यात आलेल्या आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा - सावधान! तिसऱ्या लाटेत कोरोनाबरोबरच बालकांना होतेय नवीन आजाराची लागण
मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रयत्न -
जिल्ह्यात लसीचा तुटवडा आहे. लस जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे. तसेच सिंधुदुर्गचा मृत्यूदर कमी करण्यासाठी आमचे जिल्हा प्रशासन म्हणून प्रयत्न आहेत, असे त्यांनी सांगितले. येत्या काळात शिक्षकांना व फ्रन्टलाइनवर काम करणाऱ्या लोकांना लवकरच लसीकरण करण्यासंदर्भात प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.
लॉकडाऊन वाढणार का?, याबाबत विचारले असता त्यांनी अद्यापपर्यंत आपण त्यावर काही भाष्य करू शकत नाही, असे सांगून अधिक बोलणे टाळले.
प्लाझ्मा मशीन घेण्यासाठी २५ लाख रुपये निधी मंजूर -
सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी लागणारे प्लाझ्मा मशीन घेण्यासाठी आज झालेल्या बैठकीत २५ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. लवकरच ही मशीन घेण्यात येणार असल्याची माहितीही मंत्री सामंत यांनी दिली.
हेही वाचा - मुंबईत 6082 रुग्णांची कोरोनावर मात, 1717 नवे रुग्ण