सिंधुदुर्ग - जिल्ह्यात गेले आठवडाभर पडलेल्या तुफान पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पूरग्रस्त झालेल्या जिल्ह्यातील ३९ गावांमधील २९० कुटुंबातील १ हजार २७१ नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली आहे.
जिल्ह्यातील ३९ गावातल्या नागरिकांचे स्थलांतर -
नागरिकांचे स्थलांतर करण्यात आलेल्या गावांमध्ये दोडामार्ग तालुक्यातील ७, सावंतवाडी तालुक्यातील १०, वेंगुर्ला तालुक्यातील १, कुडाळ तालुक्यातील ८, मालवण तालुक्यातील ४, देवगड तालुक्यातील ५ आणि कणकवली शहरातील नागरिकांचे पुरामुळे स्थलांतर करण्यात आले आहे.
२९० कुटुंबातील नागरिकांना हलविले सुरक्षित स्थळी -
तालुकानिहाय स्थलांतरित कुटुंबे पाहता दोडामार्ग एकूण १०७ कुटुंबांतील ४२५ व्यक्ती, सावंतवाडी ८४ कुटुंबातील ४५१, वेंगुर्ला २ कुटुंबातील ११ व्यक्ती, कुडाळ ७२ कुटुंबातील २७३ व्यक्ती, मालवण ७ कुटुंबांतील २६ व्यक्ती, कणकवली ३ कुटुंबातील २२ व्यक्ती, देवगड १५ कुटुंबातील ६३ व्यक्ती, अशा एकूण २९० कुटुंबातील १२७१ व्यक्तींचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली आहे.
गाळेलमधील तिसऱ्या दिवशीही शोधकार्यात अपयश -
दरम्यान, बांदा-गाळेल येथे डोंगर कोसळून मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या युवकाचा शोध घेण्यासाठी त्याची दुचाकी हाच एक शेवटचा पर्याय उरला आहे. त्यामुळे दुचाकीवरच मदार ठेवून डिटेक्टरच्या सहाय्याने त्याचा शोध घेतला जाईल,अशी माहिती पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी दिली.दरम्यान आज तिसऱ्या दिवशीही त्याचा शोध घेण्यास प्रशासनाला अपयश आले आहे. त्यामुळे सायंकाळी उशिरा ही मोहीम थांबविण्यात आली,असेही त्यांनी यावेळी सांगितले. दाभाडे यांनी येथील पोलीस ठाण्याला भेट दिली यावेळी ते बोलत होते.