सिंधुदुर्ग - जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. बुधवारी जिल्ह्यात आणखी १० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यात जिल्हा रुग्णालयातील दोन नर्सचाही समावेश आहे. तर गुरुवारी ५ रुग्णांची भर पडली, यात मालवण येथे करण्यात आलेल्या रॅपिड टेस्टमधे दोन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तसेच जिल्हा रुग्णालयातील कोव्हिड सेंटरमध्ये ३ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. जिल्ह्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३६१ इतकी झाली आहे. तर आत्तापर्यंत एकूण २७१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने सध्या एकूण ८४ रुग्ण उपचार घेत आहेत.
बुधवारी आढळून आलेल्या १० रुग्णांमध्ये सावंतवाडी कारिवडे येथील ३, कुडाळ तालुक्यातील झाराप १, ओरोस २, सोनवडे सरंबळ १ तर कणकवली तालुक्यातील नांदगांव येथील २ आणि कुंभवडे एका रुग्णाचा समावेश आहे. तर गुरुवारी सापडलेल्या ५ रुग्णांमधे मालवण येथील रॅपिड टेस्टमध्ये आढळलेले २ रुग्ण तर कणकवली शहर १, नांदगांव १ आणि सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली येथील १ अशा रुग्णांचा समावेश आहे.
जिल्हा कोरोना तपासणी केंद्राला नव्याने १९१ कोरोना तपासणी नमूने प्राप्त झाले आहेत. त्यामुळे कोरोना तपासणीसाठी घेतलेल्या नमुन्यांची संख्या ६ हजार ५१ इतकी झाली आहे. यातील ५ हजार ९१७ नमुने प्राप्त झाले आहेत. अजुन १३४ नमुना अहवाल प्रलंबित आहेत. प्राप्त अहवालातील ५ हजार ५५९ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर आतापर्यंत एकूण ३६१ अहवाल बाधित आले आहेत. बाधितांपैकी २७१ रुग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे जिल्ह्यात सध्या एकूण ८४ रुग्ण सक्रिय राहिले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यातील आयसोलेशन कक्षात सध्या १२७ रुग्ण उपचार घेत आहेत. यातील डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल असलेल्या जिल्हा रुग्णालयात ३७ कोरोनाबाधित आणि ४५ कोरोना संशयित उपचार घेत आहेत. यासोबतच डेडिकेटेड कोव्हिड हेल्थ सेंटरमध्ये २३ कोरोनाबाधित तर १ कोरोना संशयित उपचार घेत आहे. तर कोव्हिड केअर सेंटरमध्ये १४ कोरोनाबाधित उपचार घेत आहेत. तसेच ४ कोरोना बाधितांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. यात ३ जिल्ह्याबाहेरील रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, गुरुवारी जिल्ह्याच्या आरोग्य पथकाकडून जिल्ह्यातील ४ हजार ४२४ व्यक्तींची आरोग्य तपासणी करण्यात आली. यातील कोणालाही कोरोनाचे लक्षण आढळले नाही, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
जिल्ह्यातील संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आणखी तब्बल १ हजार ५६४ व्यक्तींची वाढ झाल्याने एकूण संख्या १८ हजार १९७ इतकी झाली आहे. यातील शासकीय संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये १ व्यक्ती कमी झाल्याने येथील संख्या ५२ झाली आहे. गाव पातळीवरील संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये १ हजार ५०६ व्यक्ती कमी झाल्याने येथील संख्या १४ हजार ७१० झाली आहे. नागरी क्षेत्रातील संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये अजुन ५९ व्यक्ती वाढल्या आहेत. येथील संख्या ३ हजार ४३५ झाली आहे. तर जिल्ह्यात नव्याने १ हजार ६०२ व्यक्ती दाखल झाल्याने २ मेपासून जिल्ह्यात दाखल होणाऱ्या व्यक्तिंची संख्या १ लाख ५८ हजार २२७ झाली आहे. तर सद्यस्थितित जिल्ह्यात एकूण ३७ कंटेन्टमेंट झोन कार्यरत आहेत.