सातारा - येरवडा कारागृहात झालेल्या किरकोळ वादातून पुणे जिल्ह्यातील तरूणाचा खून करून मृतदेह वाठार (ता.खंडाळा) गावच्या हद्दीत टाकल्याची घटना उघडकीस आली. मंगेश सुरेंद्र पोमण (रा. पोमणनगर, ता.पुरंदर) असे मृत युवकाचे नाव आहे. याप्रकरणी लोणंद पोलिसांनी वैभव सुभाष जगताप (रा.पांगारे, ता.पुरंदर) याला अटक केली आहे. तर त्याचा साथीदार ऋषीकेश दत्तात्रय पायगुडे (रा.कुडजे, ता.हवेली) हा अद्याप फरार असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी दिली.
कारागृहात झाली ओळख -
वैभव व ऋषीकेश हे पुणे जिल्ह्यातील सराईत गुंड असून त्यांच्यावर विविध पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. वैभव याला खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा लागली होती. त्यातील एका गुन्ह्यात हे दोन्ही संशयित व मंगेश हा अत्याचाराच्या गुन्ह्यात येरवडा कारागृहात बंदी होते. दरम्यान, मंगेश व संशयित हे कारागृहातील एका बॅराकमध्ये एकत्र असताना त्यांच्यात किरकोळ वाद झाले होते. त्यानंतर मंगेश हा कारागृहातून जामिनावर बाहेर आला होता. त्यापाठोपाठ संशयित देखील कारागृहातून जामीनावर बाहेर आले होते.
वादाचा घेतला असा बदला -
संशयितांनी कारागृहातील वादाचा बदला घेण्यासाठी संशयिताला भेटण्यासाठी म्हणून सासवडमध्ये दि. 9 रोजी बोलवून घेतले. दिवसभर संशयित व मृत हे एकत्र सासवड परिसरातून फिरले व रात्री संशयितांनी अंधाराचा फायदा घेत मंगेशचा गळा आवळून खून केला. खुनाच्या घटनेनंतर संशयितांनी मंगेशचा मृतदेह दुचाकीवरून लोणंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाठार बुद्रुक या गावच्या परिसरात आणून टाकला. ही घटना 10 जूनला सकाळच्या सुमारास लोणंद पोलिसांना कळाली. यानंतर त्यांनी घटनास्थळी मृतदेहाची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला. पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे, सहाय्यक निरीक्षक विशाल वायकर यांनी तांत्रिक तपासाद्वारे मृतदेहाची ओळख पटवली.
हेही वाचा - १६ जूनपासून मूक आंदोलनाला सुरूवात; मराठा समाजाची दिशाभूल होऊ देणार नाही - खासदार छत्रपती संभाजीराजे
12 जूनला पांगारे (ता. पुरंदर) येथे वैभव जगताप असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी एक पथक पाठवले. गावात पोलीस आल्याची माहिती मिळताच जगताप याने डोंगरात पळ काढला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून त्याच्या मुसक्या आवळल्या. ताब्यात घेतल्यानंतर जगताप हा गुन्ह्याची कबुली देत नव्हता. मात्र, पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने आपण मित्र ऋषीकेश याच्या मदतीने मंगेश याचा कारागृहातील वादाच्या रागातून गळा आवळून खून केल्याची कबुली दिली.
ही कारवाई सहाय्यक निरीक्षक विशाल वायकर, उपनिरीक्षक गणेश माने, सहाय्यक फौजदार शौकत सिकिलकर, हवालदार देवेंद्र पाडवी, महेश सपकाळ, अंकुश इवरे, अविनाश नलवडे, संतोष नाळे, ज्ञानेश्वर मुळीक, श्रीनाथ कदम, अभिजीत घनवट,सागर धेंडे, अविनाश शिंदे, विठ्ठल काळे, फैयाज शेख, अमोल पवार, शशिकांत गार्डी, गोविंद आंधळे, केतन लाळगे, महिला पोलीस प्रिया दुरगुडे, मल्हारी भिसे यांनी केली.