सातारा : कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यालयीन जीमेल अकाऊंटवर रात्री पावणे एकला धमकीचा ईमेल आला होता. सकाळी हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर चव्हाण यांच्या वाय दर्जाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली.
संशयित नांदेड पोलिसांच्या ताब्यात : संशयिताने शिवराळ भाषेत ई मेलद्वारे पृथ्वीराज चव्हाण यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. पृथ्वीराज चव्हाण नांदेडमधून धमकीचा ईमेल आल्याचे स्पष्ट झाल्यानंतर कराड शहर पोलिसांनी नांदेड पोलिसांनी संपर्क साधला. नांदेड पोलिसांनी तातडीने तपास करत संशयिताला ताब्यात घेतले. माजी मुख्यमंत्र्यांना धमकी आल्यामुळे कराडसह राज्यात खळबळ उडाली. पोलिसांनी पृथ्वीराज चव्हाण यांची सुरक्षाही वाढवली आहे.
सायबर अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल : कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आयटी अॅक्ट कलम 67, आयपीसी 505, 506, 507 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी धमकीची गंभीर दखल घेत कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहेत. नांदेडला पोलीस पथक रवाना झाले आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलीस अधीक्षकांनी केले आहे.
पृथ्वीराज चव्हाणांची सुरक्षा वाढवली : पृथ्वीराज चव्हाण यांना सध्या वाय प्लस दर्जाची सुरक्षा होती. चार पोलीस कर्मचारी त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात होते. परंतु, धमकीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर एक अधिकारी आणि 5 पोलीस कर्मचारी वाढवण्यात आले. त्यामुळे एकूण 1 अधिकारी तसेच 10 पोलीस कर्मचाऱ्यांची सुरक्षा त्यांना पुरवण्यात आली आहे.
राजकीय नेत्यांनी केला संपर्क : धमकीच्या वृत्तानंतर सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना फोन करून चौकशी केली. सरकार कारवाई करत असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनीही चव्हाण यांच्याशी संपर्क साधला. काही नेत्यांनी ट्विटद्वारे या प्रकाराचा निषेध नोंदवत सरकारने कडक कारवाईची मागणी केली आहे.
हेही वाचा -
Devendra Fadnavis : महात्मा गांधींचा अपमान सहन करणार नाही; भिडेंविरुद्ध फडणवीसांचा कारवाईचा इशारा