सातारा : वाई येथील लॉजवर पोलिसांनी छापा टाकून देहविक्रयासाठी आणलेल्या दोन महिलांची सुटका केली. याप्रकरणी पोलिसांनी लॉज मॅनेजर व महिला पुरवणारा यांच्यासह अन्य एकावर गुन्हा दाखल केला आहे. तृप्ती लॉज असे या लॉजचे नाव आहे. पोलिसांनी शिफातीने छापा टाकत ही कारवाई केली.
माहितीवरुन आखली मोहीम..
मॅनेजर बसराज मानिक मान्याळ (वय ४३, बोधेवाडी, ता. कोरेगांव हल्ली रा. तृप्ती लॉज, वाई) आणि नवनाथ ऊर्फ पप्या अनिल जाधव (वय २७, बावधन ता.वाई (महीला पुरविणारा) अशी संशयितांची नावे आहेत. वाई पोलिसांना पी.आर.चौक, ब्राम्हणशाही वाई येथे तृप्ती लॉजवर देहविक्रयासाठी मुली पुरविल्या जात असल्याची खबर मिळाली. त्यावरून पोलिसांनी त्याठिकाणी छापा टाकण्याची योजना आखली.
पीडिता सुधारगृहात..
पोलिसांनी छापा मारण्याच्या उद्देशाने लॉजवर बोगस ग्राहक पाठवले आणि नंतर छापा टाकला. त्याठिकाणी वेश्यागमनाकरीता लॉज मॅनेजरने दोन महिलांना आणून ठेवल्याचे दिसून आले. त्यांना ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी मॅनेजर व वेश्यागमनाकरीता महीला पुरविणारा यांच्यासह अन्य एक अशा तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. पीडित महिलांना सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून आशा कराडमधील किरण सुधारगृहात दाखल करण्यात आले आहे.
याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक संजय मोतेकर तपास करत आहेत. ही कारवाई पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांच्या सुचनांप्रमाणे सहाय्यक फौजदार विजय शिर्के, कृष्णराज पवार, सोमनाथ बल्लाळ, किरण निंबाळकर, श्रावण राठोड, अक्षय नेवसे, महिला पोलिस दिपिका निकम आणि सोनाली माने यांनी केली.