सातारा : कराडनजीकच्या वनवासमाची गावच्या डोंगरात जळण आणण्यासाठी गेलेल्या महिलेची अज्ञाताने हत्या केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. लता मधूकर चव्हाण (वय ४५), असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. महिलेच्या खुनामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
डोंगरातील झाडीत आढळला मृतदेह : लता चव्हाण या मंगळवारी दुपारी जळण आणण्यासाठी डोंगराकडे गेल्या होत्या. त्यांची दोन्ही मुले आणि पती कामानिमित्त बाहेर गेले होते. सायंकाळी मुले व पती घरी आली तेव्हा लता घरात नव्हत्या. लता यांना जळण आणण्यासाठी डोंगराकडे जाताना काही लोकांनी पाहिले होते. त्यामुळे नातेवाईकांनी डोंगराकडे धाव घेतली. बॅटरीच्या साहाय्याने शोध घेताना झाडीत त्यांचा मृतदेह आढळला.
श्वान पथकास पाचारण : लता चव्हाण यांचा खून करण्यात आल्याचे शवविच्छेदनात स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली. तळबीड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे यांनी श्वान पथकास पाचारण केले.
श्वान पथकाकडून तपास : लता चव्हाण यांचा खुन गेल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी अज्ञातावर खुनाचा गुन्हा दाखल केला. अतिरिक्त पोलिस अधीक्षक बापू बांगर, पोलीस उपअधीक्षक डॉ. रणजीत पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, तळबीडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहूल वरोटे यांच्यासह ठसे तज्ज्ञ, श्वान पथकाने कसून तपास केला.
संशयितांना घेतले ताब्यात : दिवसभरात पोलिसांनी चौकशी करून काही संशयितांना ताब्यात घेतले आहे. मात्र, महिलेच्या खुनामागील कारण अद्याप समोर आलले नाही. पोलीस सर्व शक्यता गृहीत धरून तपास करत आहेत.
महिलेची हत्या : लता चव्हाण यांचा अज्ञाताने खुन केल्यानंतर त्या जिवंत राहू नयेत म्हणून त्यांच्यावर घाव घातले असल्याचे दिसून येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. महिलेच्या खुनामागील कारणाचा पोलीस तपास करत आहेत.