सातारा - नवरासोडून प्रियकरासोबत संसार थाटलेल्या महिलेसह तिच्या दोन मुलांचाही नराधमाने खून केल्याने खळबळ उडाली. ही घटना कोरेगाव तालुक्यातील वेलंग शिरंबे येथे गुरुवारी उघडकीस आली आहे. दत्ता नारायण नामदास असे संशयीत मारेकरी प्रियकराचे नाव असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. तर योगिता ( वय 38 ) असे महिलेचे नाव असून समीर आणि तनू असे खून झालेल्या मुलाची नावे आहेत.
महिला आणि तिच्या मुलांसोबत राहत होता संशयित - दत्ता नारायण नामदास हा योगिता (वय ३८) आणि तिच्या दोन मुलांसमवेत वेलंग येथे राजेंद्र भिकू सपकाळ यांच्या घरात भाड्याने घरात राहत होता. तो मूळचा उसमानाबाद जिल्ह्यातील राजेबोरगावचा आहे. पोलीस पाटील सचिन सुतार यांनी गुरुवारी रहिमतपूर पोलीस ठाण्यात येऊन योगिता ही मृतावस्थेत आढळल्याचे सांगितले. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक प्रमोद सावंत हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करत असताना तिच्या गळ्यावर अनेक ठिकाणी ओरखडल्याच्या खुणा दिसून आल्या. तसेच नाकातून रक्तस्त्राव झाला होता. घातपाताचा संशय आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला.
संशयित फरार झाल्याने खुनाचा संशय बळावला - योगिता समवेत राहणारा दत्ता नामदास हा वेलंग गावात आढळून आला नाही. तो अकलूज जवळच्या श्रीपुरबोरगावात बहिणीच्या घरी असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्याने दिली होती. त्यामुळे पोलिसांनी अकलूज पोलिसांना याबाबतची माहिती दिली. अकलूज पोलिसांनी दत्ताला त्याच्या बहिणीच्या घरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता, तिघांच्या खुनाचा खळबळजनक घटनाक्रम त्याने पोलिसांसमोर कथन केला. खुनाची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी मुलांचा विहिरीत शोध सुरू केला. एका मुलाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला, तर दुसऱ्या मुलाची शोधमोहीम अद्यापही सुरू आहे.
योगिताचा गळा दाबला, मुलांना विहिरीत ढकलले - योगिता आणि दत्ता हे दोघेही एकाच गावातील आहेत. योगिता ही विवाहित होती. मात्र पतीला सोडून ती आपल्या दोन मुलांसह दत्तासोबत राहत होती. तिचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून दत्ताने बुधवारी रात्री दहाच्या सुमारास झोपेत असताना योगिताचा गळा दाबून खून केला. यावेळी योगिताची मुले समीर व तनू ही झोपलेली होती. त्यांना झोपेतून उठवून बाथरुमला नेण्याचा बहाणा करत दत्ताने दुचाकीवरुन जवळच्या मळ्यातील विहिरीकडे नेले. त्यानंतर त्या दोन्ही मुलांना विहिरीत ढकूलन दिल्याची माहिती दत्ताने पोलिसांना दिली. पोलिसांनी तात्काळ विहिरीकडे धाव घेऊन शोध घेतला असता, एका मुलाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला. मात्र दुसऱ्या मुलाचा मृतदेह अद्यापही सापडला नसल्याने पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या खुनाच्या घटनेचा 24 तासात छडा लावल्याबद्दल पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी कोरेगावचे पोलीस उपाधीक्षक गणेश किंद्रे, रहिमतपूर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रमोद सावंत यांचे कौतुक केले.