सातारा - फलटण येथील प्रवीण जाधव या खेळाडूने टोकियो येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल पर्यंत मजल मारण्यासाठी प्रयत्न केलेले. आगामी काळात होणाऱ्या ऑलिम्पिक व इतर खेळासाठी प्रवीण जाधवला आंतरराष्ट्रीय दर्जाचे ट्रेनिंग मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याची ग्वाही विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिली.
फलटणला प्रशिक्षण केंद्र उभारणार
फलटण येथील विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या 'लक्ष्मी - विलास पॅलेस' या निवासस्थानी प्रवीण जाधव यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. त्या वेळी रामराजे नाईक निंबाळकर बोलत होते. या वेळी सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व सदस्य संजीवराजे नाईक निंबाळकर, विकास भुजबळ प्रमुख उपस्थित होते. फलटण तालुका व सातारा जिल्ह्याच्या वतीने सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून जाहीर सत्कार करण्यात येईल. फलटण तालुक्यासह सातारा जिल्ह्यातील विद्यार्थी व खेळाडूंना प्रेरणा मिळण्यासाठी प्रवीण जाधव यांचा सन्मान आगामी काळामध्ये करण्यात येणार आहे. फलटण तालुक्यात मुले व मुलींचे हॉकी, कबड्डी या खेळांसह विविध खेळांमध्ये उत्कृ प्रशिक्षण मिळण्यासाठी फलटण येथे प्रशिक्षण केंद्र व उत्कृष्ठ दर्जाचे प्रशिक्षक उपलब्ध करून देणार आहे, असेही रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
प्रवीणचा सार्थ अभिमान
फलटण सारख्या ग्रामीण भागातील खेळाडूंना आगामी काळामध्ये उत्तोत्तम प्रशिक्षण देण्यासाठी आपण या पुढे कार्यरत राहणार आहोत. फलटण तालुक्यातील सरडे सारख्या गावातून प्रवीण जाधव याने आर्चरी या खेळामध्ये शिक्षण घेतले व टोकियो येथे झालेल्या ऑलम्पिक मधील पदकापर्यंत मजल मारली, त्या बद्दल फलटण तालुक्यातील सर्व जनतेला त्याचा सार्थ अभिमान आहे, असेही रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले.
अगली बार प्रवीण जाधव
प्रवीण जाधव यांची पहिली वेळ असल्याने त्यांना या वेळी अपयश आले. पुढच्या होणाऱ्या ऑलिम्पिक साठी प्रवीण जाधव यांना आंतरराष्टीय दर्जाचे ट्रेनिंग देवून प्रवीण हे पुढच्या ऑलिम्पिक मध्ये पदक मिळवतील, ही खात्री आपल्या सगळ्यांना आहे, असे मत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी या वेळी व्यक्त केले.
हेही वाचा - मुंबईकरांसाठी सर्वात मोठी बातमी, 15 ऑगस्टपासून लसवंतांसाठी लोकल सुरू