कराड (सातारा) - कपिल सिब्बल यांच्या वक्तव्याचा गैरअर्थ काढण्यात आला आहे. काँग्रेस पक्षाला पुर्णवेळ अध्यक्ष हवा, हेच सिब्बल यांना सांगायचे होते. राहूल गांधींनी ती जबाबदारी घेतल्यास आम्हाला आनंदच होईल, असे सांगत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सिब्बल यांच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे. दिवाळी फराळाच्या निमित्ताने आज त्यांनी कराड येथील निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर आपले मत व्यक्त केले.
बिहारमध्ये काँग्रेसची कामगिरी निराशाजनक; आत्मपरिक्षणाची गरज-
बिहार निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी निराशाजनक झाली. परंतु, पक्षांतर्गत आत्मपरिक्षण झाल्याशिवाय त्यावर बोलणे योग्य नाही. भाजपाची जाहिरात यंत्रणा मोठी आहे. तरीही त्यांचा पराभव होऊ शकतो. त्यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र येणे आवश्यक आहे. साम, दाम, दंड, भेद नीतीचा वापर करून आणि दबाव तंत्राचा वापर करत विरोधी पक्षातील लोक जाळ्यात ओढले जात आहेत. काँग्रेस हा विचारांवर वाटचाल करणारा पक्ष आहे. भाजपला विचारांची परंपरा नाही. त्यामुळे ते सत्तेचा गैरवापर करत असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला.
तेजस्वी यादव बिहारमधील उदयनोन्मुख नेतृत्व-
लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव यांनी निवडणुकीत खूप कष्ट घेतले. आक्रस्ताळेपणा न करता त्यांनी संयमाने प्रचार केल्याचे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. तसेच या निवडणुकीमध्ये भाजपाने नितीशकुमारांसह त्यांच्या पक्षाचेही खच्चीकरण केले. चिराग पास्वान यांना बळ देत भाजपाने नितीश कुमार यांचे उमेदवार पाडले. पासवान यांनी भाजपच्या उमेदवारांविरोधात लोकशाही जनशक्ती पार्टीचे उमेदवार उभे केले नाहीत. नितीश कुमार हे मुख्यमंत्री झाले असले, तरी अल्पमतातील मुख्यमंत्री प्रभावी काम करू शकत नाही, असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
कपिल सिब्बलांच्या वक्तव्यांचा गैरअर्थ-
काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी कोणीतरी पूर्णवेळ घेणे गरजेचे आहे. राहूल गांधी हे सर्वांसाठी परिचित चेहरा आहेत. ते जर अध्यक्ष होणार नसतील, तर निवडणुका घेऊन अध्यक्ष निवडणे गरजेचे आहे. या संदर्भात आम्ही ठराविक लोकांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधींना गोपनीय पत्र लिहून कळवले होते. त्या पत्रातील ठराविक मजकूर प्रसिद्ध केला गेला. त्यामुळे गैरसमज निर्माण झाला असल्याचे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. कपिल सिब्बल यांनी आता जे वक्तव्य केले आहे. त्याचाही गैर अर्थ काढला गेला आहे. राहूल गांधी हे पूर्णवेळ पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी घेणार असतील, तर आम्हाला आनंदच होईल, असेही ते म्हणाले.