सातारा - परतीच्या पावसाने दुष्काळी माणमध्ये पाणीच पाणी झाले आहे. कोरड्या माण नदीसह सगळेच पाणीसाठे वाहू लागले आहेत. यामध्ये ब्रिटिशकालीन पिंगळी तलाव सांडवा, राजेवाडी तलाव सांडवा, पृथ्वी बंधारे वाहू लागले आहेत. नुसते वाहत नाही तर ते भरून वाहत असल्याने धबधबेच तयार झाले आहेत. मग काय..निसर्गप्रेमींसाठी हे धबधबे आकर्षण ठरले नाही तर नवलच. हे कृत्रिम धबधबे एन्जॉय करण्यासाठी आता गर्दी वाढू लागली आहे.
हेही वाचा - काजरोळकर यांच्या पुस्तकातून विद्यार्थ्यांना मिळणार वृत्तपत्रलेखनाचे धडे
ब्रिटिशकालीन पिंगळी तलावाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागल्याने आधीच वाहत असलेल्या ओढ्याला पाणी वाढले. या ओढ्यावर गोंदवले-दहिवडी रस्त्यावर असणाऱ्या बंधाऱ्यावरून पाणी कोसळू लागले आहे. कोसळणारे पांढरे शुभ्र दुधासारख्या पाण्याने धबधब्याचे रूप धारण केले आहे. रस्त्यावरून दिसणारा हा नयनरम्य धबधबा निसर्गप्रेमींना चांगलीच भुरळ पाडत आहे.
हेही वाचा - मुंबईत भाऊबीज उत्साहात साजरी
त्यामुळे याठिकाणी येऊन मौजमजा करण्यासाठी गर्दी होत आहे. अनेकजण तर हे क्षण आठवणीत साठवण्यासाठी कॅमेऱ्यामध्ये व्हिडिओज शूट करत आहेत. त्यामुळे हा धबधबा जणू सेल्फी पॉईंटच बनला आहे. गोंदवलेकर महाराज समाधी दर्शनासाठीही मोठ्या संख्येने पर्यटक येत आहेत. तर, समाधी दर्शनानंतर अनेकांनी या धबधब्यांवर जाऊन सुट्टी एन्जॉय करताना पाहयला मिळत आहेत.