सातारा- शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास तलावात पाणीसाठा खालावला आहे. सध्या पाणीसाठा ५.५ फूटावरती गेला आहे. शहराला सध्या शहापूर पाणीपुरवठा योजनेतून पाणी दिले जात आहे. सध्या कास तलावात दहा जूनपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक असल्याचे पालिकेकडून सांगण्यात येत आहे.
सातारा शहराला कास व शहापूर या दोन योजनेतून पाणीपुरवठा केला जातो. शहरात काही भागात सकाळी तर काही भागात संध्याकाळी पाणी सोडण्यात येते. कास तलावात पाणीसाठा दहा जून पर्यंतच पुरेल, असे देखील सांगण्यात आले आहे. तर आधी पेक्षा कमी पाणीपुरवठा होत असल्याचा नागरिक आरोप करत आहेत. कास तलावात पाणीसाठा घटल्याने पाणीपुरवठा करण्यासाठी अडचणी येत असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे.
तर काही दिवसांपूर्वी बोगदा मार्गावर महिलांनी पाण्यासाठी आंदोलन करून रस्ता आडवला होता. यावेळी पालिकेचे अधिकारी व पाणीपुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर यांनी त्याठिकाणी जाऊन नागरिकांची समजूत काढून आंदोलन मागे घेण्यास सांगितले होते व तात्काळ शहापूर योजनेचे पाणी नागरिकांना देण्याचे सभापती यांनी सांगून पाणीपुरवठा सुरू केला होता. सध्या सातारा शहरात पाण्याची मोठी अडचण निर्माण झाली आहे. पाणी येत नसल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.