कराड (सातारा) - पाटण तालुक्यातील महिंद धरणाच्या सांडव्याच्या बाजुची संरक्षक भिंत जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे कोसळली. मात्र, धरण सुरक्षित असल्याचा निर्वाळा व्यवस्थापनाने दिला आहे. भिंत कोसळल्याची ही घटना आज सकाळच्या सुमारास घडली.
महिंद धरणाची पाणी साठवण क्षमता सुमारे ८५ दशलक्ष घनफूट आहे. महिंद धरण एका महिन्यापुर्वीच भरून वाहू लागले होते. चार दिवसांपासून पावसाची संततधार असल्याने धरणाच्या सांडव्यातून पाणी वाहत आहे. गेल्या वर्षी धरणाची गळती काढण्यासाठी जॅकेटींगला मंत्री शंभूराज देसाई यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला होता. त्यामुळे धरणाची गळती थांबली होती. परंतु, चार दिवसांपासून जोरदार पाऊस पडत असल्याने महिंद ते बोर्गेवाडी रस्त्यावर सांडव्याच्या बाजुला रस्त्यासाठी बांधलेली संरक्षक भिंत कोसळली. त्यामुळे रस्ता खचण्याची शक्यता आहे. परंतु, धरणाला कोणताही धोका नसल्याचे धरण प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
तसेच ही भिंत कोसळल्याने नदीकाठच्या गावातील लोकांनी घाबरून जाण्याचे कारण नसल्याचेही आवाहन धरण व्यवस्थापनाकडून करण्यात आले आहे.