सातारा - वाईमार्गे पाचगणी-महाबळेश्वरकडे व कोकणात जाणारा रस्ता पसरणी घाटात दुरुस्तीच्या कामामुळे आज (30 जून) पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. येथील वाहतूक पाचवड कुडाळ व नागेवाडी, वाई मार्गाने वळवण्यात आली आहे. त्यामुळे वाईमार्गे पसरणी घाटातून महाबळेश्वरला निघाला असाल तर थोडं थांबावं लागेल.
संरक्षक भिंतींची दुरुस्ती
पसरणी घाटामधील मोऱ्या व संरक्षक भिंती सततच्या पावसामुळे पडलेल्या आहेत. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीस धोकादायक झालेला आहे. त्याची दुरुस्ती करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. हा रस्ता वाहतुकीस सुस्थितीत करण्यासाठी मोरीचे व संरक्षक भिंतीचे बांधकाम सुरु झाले आहे. मोठमोठ्या यंत्रसामुग्री वापरून ही दुरुस्ती सुरु असल्याची माहिती उपअभियंता श्रीपाद जाधव यांनी दिली.
वाहतूक दिवसभर राहणार बंद
यामार्गावरून पाचगणी, महाबळेश्वर व कोकणात मध्यममार्ग म्हणून मोठी वाहतूक असते. पसरणी घाट दुरुस्तीमुळे सुरुर, वाई, पसरणी, पाचगणी, महाबळेश्वर, पोलादपूर या परिसरातील या भागातील वाहतूक दिवसभर बंद राहणार असल्याचे श्रीपाद जाधव यांनी सांगितले. दरम्यान, घाट दुरुस्तीमुळे वाई येथे रस्त्यावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
हेही वाचा - दहिसरमध्ये गोळी झाडून ज्वेलर्स मालकाची हत्या