सातारा - जिल्ह्यातील आठ बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी (दि. 30) मतदान होणार आहे. प्रचाराच्या निमित्ताने गेली आठ दिवस आरोप-प्रत्यारोंचा धुरळा उडाला. स्थानिक राजकीय संदर्भ लक्षात घेऊन काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना (शिंदे, ठाकरे गट) आणि भाजप हे पक्ष आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. नेत्यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागल्याने मतदारांचा भाव वधारला आहे. कराडमधील काही मतदार हैदराबाद, सहलीवर गेले आहेत.
'या' बाजार समितींसाठी होणार मतदान - सातारा जिल्ह्यातील सातारा, कराड, पाटण, वाई, कोरेगाव, फलटण, वडूज आणि लोणंद या आठ बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी मतदान होणार आहे. या निवडणुकीमध्ये उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार मकरंद पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
कराडमधील मतदार सहलीवर - कराड तालुक्यातील बाजार समितीच्या मतदारांना चांगलाच भाव आला आहे. निवडणुकीतील चुरशीमुळे एका पॅनेलच्या काही मतदारांना हैदराबाद, गोवा सहलीवर पाठविण्यात आले आहे. महिला मतदारांना सहलीवर जाणे शक्य नसल्याने त्यांच्या पतीराजांना सहलीवर पाठवून खूष करण्यात आले आहे. कराडमधील मतदारांची बडदास्त ठेवली गेली आहे. मतदारांना पैसे वाटताना कार्यकर्ते रंगेहात सापडल्याच्या घटनाही पाहायला मिळाल्या. मात्र, त्याबद्दल कोणीही तक्रार केलेली नाही.
उदयनराजेंनी उगारला आसूड - सातारा बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि खासदार उदयनराजे भोसले यांचा गट एकत्र आला आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी उदयनराजेंनी सातार्यातील पत्रकार परिषदेत बाजार समितीच्या कारभारावरून आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर हल्लाबोल केला. अन्याय करणारा आमदार, खासदार कोणीही असो. शेतकर्यांचा संयम संपला तर ते भोसकून टाकतील, असे उदयनराजे म्हणाले. तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिलेला आसूड उगारत उदयनराजेंनी विरोधकांना इशारा दिला.