सातारा - कोरोना महामारी आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन करत गोडोलीतील जिजामाता उद्यानासमोर जमाव जमवून दुचाकीवर केक कापणाऱ्या दहा जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सहा दुचाकी ताब्यात
या कारवाईत पोलिसांनी सहा दुचाकी ताब्यात घेतल्या आहेत. याबाबत पोलिसांनी सांगितले की, गोडोली येथील जिजामाता उद्यानासमोर रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास 20 ते 25 वयोगटातील दहा ते पंधरा मुले दुचाकीवर केक घेऊन वाढदिवस साजरा करत होते. यावेळी पोलीस तेथे पोहोचले. पोलिसांना पाहताच युवक दुचाकी सोडून तेथून पळून गेले. पोलिसांनी सहा दुचाकी ताब्यात घेतल्या आहेत.
बर्थडे बॉय ही अडचणीत
ही मुले अजय भांडे (रा. गोडोली सातारा) याचा वाढदिवस साजरा करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. घटनास्थळावरून पोलिसांनी सर्व दुचाकी ताब्यात घेतल्या असून याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक गणेश काटे यांनी फिर्याद दिली आहे. अजय भांडे यांच्यासह दहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस हवालदार जयवंत कारंडे अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा - पाटणमध्ये बोगस कोरोना चाचण्या, डॉक्टरसह लॅब चालकावर गुन्हा दाखल
हेही वाचा - कोरोनाने महिलेचा मृत्यू, नातेवाईकांनी केलं गुपचूप अंत्यसंस्कार, पुढे काय घडलं वाचा...