सातारा - भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सातारा जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आणि कराड नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष कॉम्रेड बादशाह अल्ली मुल्ला (वय 85) यांचे रविवारी पहाटे निधन झाले. सायंकाळी शाही कब्रस्तानमध्ये त्यांच्यावर पार्थिवावर अंत्यविधी झाला. यावेळी कराडमधील सर्वपक्षीय नेते, हिंदू-मुस्लिम बांधव उपस्थित होते. त्यांनी बादशाह अल्ली मुल्लांना अखेरचा लाल सलाम केला.
सातारा जिल्ह्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक कॉम्रेड शेख काका, कॉम्रेड डी. एम. पाटील, कॉम्रेड राजारामबापू पाटील यांच्या समवेत त्यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षात प्रवेश केला होता. भाकपसह डाव्या आणि लोकशाही आघाडीच्या सर्व आंदोलनात ते सक्रिय सहभागी होते. महागाई विरोधी, कामगार-कष्टकरी, दीन-दलितांच्या प्रश्नांसाठी त्यांनी अनेक आंदोलने केली होती. कराड नगरपालिकेत 1985 ते 2011 असे दीर्घकाळ ते नगरसेवक होते. माजी नगराध्यक्ष व ज्येष्ठ नेते स्व. पी. डी. पाटील यांच्या कार्यकाळात काही काळ त्यांनी उपनगराध्यक्षपद भूषविले होते. तसेच बांधकाम, नियोजन, पाणी पुरवठा आणि आरोग्य समितीचे ते सभापतीही होते.
कराड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा गांधी यांच्या पुतळा उभारणीमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. सामाजिक ऐक्यासाठी त्यांचा नेहमी पुढाकार असायचा. गोवा मुक्ती आंदोलनात तुरुंगवास, संयुक्त महाराष्ट्र सीमा लढ्यात सक्रिय सहभाग, मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनात सहभाग नोंदवून त्यांनी खर्या अर्थाने सामाजिक कार्यात आपला ठसा उमटवला होता. याशिवाय 1980 मध्ये त्यांनी कराड उत्तर विधानसभा मतदार संघातून भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने विधानसभा निवडणुकही लढवली होती.
बादशाह अल्ली मुल्ला यांच्या पार्थिवावर रविवारी सायंकाळी शाही कब्रस्तानमध्ये दफनविधी पार पडला. यावेळी सहकार मंत्री तथा सातार्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खा. श्रीनिवास पाटील यांनी समाजवादी चळवळीतील अखेरचा दुवा निखळल्याची भावना यावेळी व्यक्त केली. तसेच सर्वपक्षीय नाकरीकांनी कॉम्रेड बादशाह अल्ली मुलांना अखेरचा लाल सलाम केला.