सातारा - पुणे-बंगळुरू महामार्गावर शिरवळजवळ आज ( 19 जून ) पहाटे कोल्हापूर जिल्ह्यातील वारकर्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला. आयशर टेम्पोने धडक दिल्याने आळंदीला निघालेल्या वारकर्यांची ट्रॉली पलटी होऊन एका वारकर्याचा मृत्यू झाला. तर, 30 वारकरी जखमी झाले आहेत. मृत आणि जखमी वारकरी हे कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्ह्यातील भादोले आणि लाहोटे गावातील आहेत. जखमींवर शिरवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू ( Varkari Tempo Accident In Satara ) आहेत.
आयशर टेम्पोची ट्रॉलीला धडक - कोल्हापूर जिल्ह्यातील भादोले आणि लाहोटे (ता. हातकणंगले) येथील वारकरी ट्रॅक्टर ट्रॉलीतून आळंदी वारीला निघाले होते. ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये सुमारे 43 वारकरी होते. पहाटे चारच्या सुमारास पुण्याकडे भरधाव निघालेल्या आयशर टेम्पो चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने शिरवळजवळ टेम्पोने विद्युत पोलला धडक दिली. त्यानंतर टेम्पोने वारकर्यांच्या ट्रॉलीला धडक दिली. या अपघातात ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये बसलेले वारकरी थेट रस्त्यावर फेकले जाऊन 30 वारकरी जखमी झाले. तर, एका वारकर्याचा मृत्यू झाला. मायाप्पा कोंडिबा माने, असे मृत वारकऱ्याचे नाव आहे.
पोलिसांची घटनास्थळी धाव - वारकर्यांच्या ट्रॉलीला अपघात झाल्याची माहिती मिळताच शिरवळ पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तसेच, पोलिसांनी तातडीने बचाव कार्य सुरू केले. सर्व जखमी वारकर्यांना त्यांनी प्राथमिक उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले. सध्या जखमी वारकर्यांवर शिरवळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच डॉ. जोगळेकर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. ट्रॉली पलटी झाल्यामुळे काही वारकरी गंभीररित्या जखमी झाले आहेत. जखमींची नावे समजू शकली नाहीत.
हेही वाचा - सुरक्षा दलाची कारवाईच, तिघांना अटक; पिस्तुल, काडतुस जप्त