सातारा- खटाव तालुक्यातील वडुजचा सर्कल अधिकारी राजेंद्र मारूती जगताप (रा.सातारा) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. त्याने बँकेच्या कर्जाचा बोजा सातबाऱ्यावरती लावून देण्यासाठी 3 हजाराची लाच शेतकऱ्यांला मागितली होती.
खटाव तालुक्यातील एका गावातील शेतकऱ्याच्या मुलाला शिक्षणासाठी पैसे लागणार असल्याने त्याने एका बँककडून कर्ज घेतले होते. मात्र, त्या कर्जाची नोंद तारण दिलेल्या जमिनीच्या सातबाऱ्यावरती नोंद केल्यानंतरच कर्जाची रक्कम त्या शेतकऱ्याला मिळणार होती. त्यामुळे त्याने सातबारा उताऱ्यावर कर्जाची नोंद घालण्यासाठी तलाठ्याकडे अर्ज केला होता.
सदर अर्ज पुढील नोंदीसाठी तो सर्कल जगताप यांच्याकडे आला होता. मात्र, ती नोंद घालण्यासाठी त्याने 5 हजार रुपयांची लाच मागितली होती. संबंधित शेतकऱ्याने सातारा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर पोलीस निरीक्षक अविनाश जगताप यांनी वडूज परिसरात सापळा लावला होता. त्यानंतर तक्रारदाराकडून तडजोडी अंती 3 हजार रुपयांची लाच घेताना जगताप याला रंगेहात पकडण्यात आले. त्याच्यावर वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक सुषमा चव्हाण, उपअधीक्षक अशोक शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे.