कराड- (सातारा) उच्च शिक्षण, नोकरी आणि दुर्धर आजारावरील उपचारासाठी परदेशी जाणार्यांसाठी सातारा जिल्हा प्रशासनाने वॉक इन लसीकरणाची सुविधा उपलब्ध केली आहे. कागदपत्रकांची पडताळणी करुन आरोग्य विभागाने प्राधान्याने संबंधितांचे लसीकरण पुर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले आहेत. सातारा जिल्हा सर्वसाधारण रुग्णालय, कराड उपजिल्हारुग्णालय आणि फलटण उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी लसीकरण पुर्ण करण्यात यावे. लसीकरण करणार्यांची अचूक माहिती विवरणपत्रात भरून रेकॉर्ड अद्ययावत ठेवावे, असेही जिल्हाधिकार्यांनी जारी केलेल्या आदेशात म्हणले आहे.
![परदेशी जाणार्यांसाठी लसीकरणाची सोय](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-str-1-vaccinationfacilityforforeignersgoingasperthedemandofmpsrinivaspatil-10054_05062021235407_0506f_1622917447_615.jpg)
परदेशात जाणार्या नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण बंधनकारक
परदेशात जाणार्या विद्यार्थी व नागरीकांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घेणे बंधनकारक आहे. यासंदर्भात अनेक विद्यार्थी, नोकरदार आणि उपचारासाठी परदेशी जाऊ इच्छिणार्या नागरीकांनी, खासदार श्रीनिवास पाटील यांची भेट घेऊन लसीकरणाची सोय व्हावी अशी मागणी केली होती. त्यानुसार खासदार पाटील यांनी जिल्हाधिकार्यांशी पत्रव्यवहार केला होता. त्याची दखल घेऊन सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी नुकताच आदेशा जारी केला आहे.
लसीकरण झाले असल्याचे प्रमाणपत्र बंधनकारक
आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार शिक्षण, नोकरी अथवा उपचारासाठी ज्या नागरीकांना परदेशात जाणे क्रमप्राप्त ठरत आहे. त्यांना लसीकरण झाले असल्याचे प्रमाणपत्र बंधनकारक आहे. त्यामुळे त्यांच्या कागदपत्रकांची पडताळणी करुन आरोग्य विभागाने संबधितांचे लसीकरण प्राधान्याने करावे. सातारा जिल्हा सर्वसाधारण रुग्णालय, कराड उपजिल्हा रुग्णालय, आणि फलटण उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी लसीकरणाची सोय केली जावी. विवरणपत्रामध्ये लसीकरण करणार्यांची अचूक माहिती भरण्यात यावी आणि त्याचे रेकॉर्ड अद्ययावत ठेवावे, असे जिल्हाधिकार्यांनी जारी केलेल्या आदेशात नमूद केले आहे.
हेही वाचा- कोरोनाबाधित आईमुळे बाळालाही संसर्ग? काय सांगताय विशेषज्ञ