सातारा -
जिल्ह्यातील काशीळ गावात सेवानिवृत्त सर्कल अधिकाऱ्याच्या बंद घराचा कडी-कोयंडा उचकटून अज्ञात चोरट्याने सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे ७ लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना बुधवारी सायंकाळी उघडकीस आली. मुंबई येथे मुलाला भेटण्यासाठी सहकुटुंब गेल्यानंतर अज्ञात चोरट्याने ही घरफोडी केली. या घरफोडीची फिर्याद गुलाब महंमद भालदार यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
बोरगाव पोलीस आणि घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, काशीळ येथील यशवंत हायस्कूल समोर सेवानिवृत्त सर्कल अधिकारी गुलाब महंमद भालदार यांचा बंगला असून, त्यांची दोन मुले रशीद व सुलतान हे नोकरीनिमित्त मुंबई व पाचगणी येथे पत्नी व मुलांसह राहतात.
शुक्रवार १२ जुलै रोजी रात्री गुलाब महंमद भालदार हे पत्नीसह मुलगा रशीद याला भेटायला मुंबईला गेले होते. बुधवारी वीज मीटरचे रिडींग घेण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्याला भालदार यांच्या घराचा दरवाजाचा कडी-कोयंडा उचकटलेला दिसल्याने त्याने शेजाऱ्यांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. शेजाऱ्यांनी याची कल्पना मुंबई येथे भालदार कुटुंब व पाचगणी येथील मुलास दिल्यानंतर सायंकाळी सर्वजण काशीळ येथील घरी परतले. घरात प्रवेश केल्यावर त्यांना बेडरूमधील दोन्ही लोखंडी कपाटे व तिजोरी उघडी असलेली आढळली. तिजोरीत असलेले सोन्याचे दागिने-चांदीचे १७ तोळ्यांचे दागिने व रोख ४ लाख रुपये असा सुमारे ७ लाख रुपये किमतीचा ऐवज चोरीला गेल्याचे समजले. याची माहिती त्यांनी रात्री उशिरा बोरगाव पोलिसांना दिली. या घटनेचा पुढील तपास बोरगाव पोलीस करत आहेत.