सातारा - वाई हत्याकांड प्रकरणाची सातारा जिल्हा न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या सुनावणीदरम्यान यातील माफीची साक्षीदार असलेली ज्योती मांढरे हिला अचानक चक्कर आली.
सातारा जिल्हा न्यायालयात वाई हत्याकांड प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. सरकार पक्षाच्यावतीने विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे काम पाहत आहेत. माफीचा साक्षीदार असलेल्या ज्योती मांढरे न्यायालयात असताना तिला अचानक चक्कर आली. ज्योतीला पाणी देऊन तिच्या तब्येतीची विचारपूस करण्यात आली. कोर्टाने १० मिनिटांचा ब्रेक घेतला. तेव्हा ज्योतीने पुन्हा ठीक असल्याचे सांगितले. त्यानंतर कोर्ट कामकाजाला सुरुवात झाली.
काय आहे वाई हत्याकांड प्रकरण?
डॉ. संतोष पोळ याने वाई शहरासह परिसरातील अनेकांचा खून केला. खून केल्यानंतर त्याने सहा मृतदेह धोम धरणालगत असलेल्या फार्म हाऊसमध्ये पुरून ठेवले. शेवटचा खून मंगल जेधे या महिलेचा केल्यानंतर सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने (एलसीबी) या प्रकरणातील ज्योती मांढरे व त्या नंतर डॉ. संतोष पोळ यांना अटक केली. ज्योती माफीची साक्षीदार झाली व डॉ. पोळ याने कशा पद्धतीने हत्याकांड केला याचा पाढा वाचला.
कंपाऊंडरचा झाला डाॅक्टर
मांढरे हिने उलट तपासणीत संतोष पोळ याने केलेल्या खुनाची सविस्तर माहिती दिल्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सांगितले. पोळ हा घोटावडेकर हॉस्पीटलमध्ये कंपाउंडर म्हणून कामाला होता. मात्र, वैद्यकीय जुजबी ज्ञानामुळे तो पंचक्रोशीत डॉ. पोळ म्हणून प्रसिद्ध होता, असे ज्योती मांढरे हिने न्यायालयासमोर सांगितले. अजून काही महत्त्वाच्या उलट तपासणी होणार आहे. बराच काळ हा खटला चालणार असल्याचे उज्वल निकम यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.