सातारा - झाले गेले विसरुन जावे, पुढे पुढे चालावे या गाण्याच्या ओळींचा प्रत्यय काल(बुधवारी) साताऱ्यात आला. राजकारणातील महारथी म्हणून ओळखले जाणारे दोन दिग्गज एकत्र आले. सध्या परस्परविरोधी पक्षात असणाऱया या नेत्यांच्या भेटीने जिल्ह्यातल्या लोकांना आश्चर्याचा धक्का बसला. हे दिग्गज आहेत उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे.

उदयनराजे भोसले आणि शशीकांत शिंदे हे अनेक वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करत होते. या दोघांची मैत्री सर्वश्रुत आहे. पण, ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उदयनराजे भाजपच्या छावणीत सामील झाले आणि या मैत्रीत वितुष्ट आले. लोकसभेच्या पोटनिवडणुकीत उदयनराजेंचा पराभव झाला. तर, शशिकांत शिंदे सुद्धा विधानसभेत पराभूत झाले. दोन पराभूत नेत्यांची ही भेट जनतेत चर्चेचा विषय ठरली.
हेही वाचा - भाजप-प्रेमी साखर कारखानदारांना महाविकासआघाडीचा धक्का, 310 कोटींची बँक हमी रद्द
विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून दोन्ही नेत्यांमध्ये अबोला होता. पण, दीड महिन्यानंतर शेंद्रे येथील एका कार्यक्रमात एकत्र येण्याचा योग आला. तेव्हा झाले गेले विसरुन जाऊन दोघांनी एकमेकांना अलिंगन दिले. दोघांच्या डोळ्यात अश्रु होते. राजकारण्यांच्या आयुष्यातील भावनीक क्षणाचे साक्षीदार होण्याचा योग यावेळी सातारकरांना आला. या भेटीमुळे जिल्ह्यातील राजकीय समिकरणे बदलणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे.