सातारा - पंतप्रधान मोदींना भेटायला जाण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी अधिवेशन बोलावून मराठा आरक्षण प्रश्नावर चर्चा करायला हवी होती. नंतर भेटले असते तर ते अधिक संयुक्तिक ठरलं असतं. राजकीय तडजोडीसाठी त्यांनी पंतप्रधानांची भेट घेतली काय? असा सवालही उदयनराजे यांनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीच्या अनुषंगाने आज साताऱ्यात राज्यसभा सदस्य उदयनराजे भोसले यांनी माध्यमांशी संवाद साधला. सभागृहात कोणतीही चर्चा न करता मुख्यमंत्र्यांनी ही भेट घेतल्याबद्दल उदयनराजेंनी माध्यमांजवळ नापसंती व्यक्त केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मराठा आरक्षण, चक्रीवादळाने झालेल्या नुकसानासह महाराष्ट्रातील अन्य महत्वपूर्ण मुद्यांवर चर्चा करण्यात आली. मुख्यमंत्र्यांसह उप-मुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आदि उपस्थित होते.
पंतप्रधानांसमवेत बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, की राज्यातील संवेदनशील विषय मराठा आरक्षण आहे. ओबीसी राजकीय आरक्षण, भरतीमधील आरक्षण, तसेच मेट्रोसाठी कारशेड, जीएसटीचा मुद्दा, पीकविमा मधील शर्ती याविषयांवर चर्चा झाली.