सातारा - आर्थिक अडचणीत असलेल्या मंडप, लाईट डेकोरेशन व्यवसायिकांनी केलेल्या धरणे आंदोलनाला भाजपचे खासदार उदयनराजे, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आंदोलनस्थळी जाऊन पाठिंबा दिला. शासनाने या व्यावसायिकांना व्यवसाय सुरू करण्याची परवानगी द्यावी, या मागणीसाठी आज राज्यव्यापी धरणे आंदोलनाचा भाग म्हणून सोमवारी मंडप व्यावसायिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आंदोलन केले. या आंदोलनात टेन्ट, मंडप, कॅटरिंग, फोटोग्राफर, मंगल कार्यालय, बॅकेट हॉल, डी.जे. साऊंड, लाईट डेकोरेशन, इव्हेंट व्यवस्थापक इ. सेवा देणारे व्यावसायिक सहभागी झाले होते. मागण्यांचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
माणुसकीच्या नात्यातून लवकर योग्य निर्णय घ्यावा-
खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन या व्यवसायिकांना पाठिंबा जाहीर केला. व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून शासनाने माणुसकीच्या नात्यातून या व्यावसायिकांच्या बाबत लवकरात लवकर योग्य निर्णय घ्यावा. या व्यावसायिकांच्या मागण्या शासनाकडे मांडून त्यांची सोडून करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, अशी ग्वाहीही उदयनराजे भोसले यांनी यावेळी दिली. यावेळी असोसिएशनचे राम हादगे, महादेव सूर्यवंशी, रमेश साळुंखे, राजेश भोसले, अशोक भोसले, संदीप गोळे, महेंद्र सोनवले, अमोल शहा आदी उपस्थित होते.