सातारा - भाजपचे राज्यसभा सदस्य उदयनराजे भोसले हे नेहमी वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असतात. भरदाव वेगाने वाहन चालवण्याचा त्यांचा छंद देखील सर्वश्रृत आहे. त्यामध्ये आधुनिक कार, अधिक सीसीची मोटारसायकल, फायर फायटर, जेसबी सारखी वाहने भरधाव वेगाने चालविण्याची कसब अनेकांनी पाहिले आहे. उदयनराजेंनी यावेळी मात्र शिवसागर (कोयना) जलाशयात थेट तराफाचा (बार्ज) सुकाणू हाती घेत ही अवजड बोट चालवण्याचा आनंद लुटला. त्यांनी स्वत:च्या वाहनांच्या ताफा या अवजड बोटीमधून उदयनराजेंनी पैलतीरावर नेला आहे. या मागचे निमित्त होते ते नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या तापोळा विभागातील दरे गावात भेट घेण्याचे, त्यावेळी त्यांनी बार्ज चालवण्याचा आनंद घेतला.
तराफाचा सुकाणू उदयनराजेंच्या हाती
महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेनेचे वजनदार नेते व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे दरे हे गाव महाबळेश्वर तालुक्यात तापोळा भागात आहे. एकनाथ शिंदे त्यांच्या दरे या गावी आपल्या कुटुंबीयांसह आलेले आहेत. खासदार उदयनराजे भोसले यांनी मंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या गावी जाऊन भेट घेतली. जावळी तालुक्यातील कोळघर-सोळशी गावातून खासदार उदयनराजे भोसले तराफ्यामधून (बार्ज) एकनाथ शिंदे यांच्या दरे गावी पोहचले. त्यावेळी कार्यकर्त्यांनीय त्यांचा व्हिडिओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर अपलोड केला आहे.
दोघांत झाली राजकीय गुफ्तगू
दरे या ठिकाणी एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे हे देखील उपस्थित होते. यावेळी उदयनराजे व मंत्री एकनाथ शिंदे यांच्यात बंददाराआड चर्चा झाली. या चर्चेचा तपशिल अद्याप समजू शकला नाही. दरम्यान या दोन बड्या नेत्यांच्या भेटीने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलेले आहे. बंद खोलीत दोनच नेत्यात अर्धा तास चर्चा झाली. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे तर खासदार उदयनराजे भाजपचे राज्यसभा सदस्य आहेत.
हेही वाचा - वसुलीप्रमाणे ठाकरे सरकारची मानहानीची नोटीसही १०० कोटींचीच, किरीट सोमैयांची खोचक टीका