सातारा : पेंटिंगवरून खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. प्रेमापोटी लोक माझे चित्र काढतात. लोकांची कामे करा, लोक तुमचेही पेंटिंग काढतील, असा टोला उदयनराजेंनी लगावला होता. त्याला शिवेंद्रराजेंनी प्रत्युत्तर दिले आहे. तुमची इतकी लोकप्रियता होती तर लोकसभेला पराभव का झाला, असा खोचक सवाल त्यांनी केला आहे.
उदयनराजेंच्या टीकेला प्रत्युत्तर : तुम्हीही लोकांची कामे करा. लोक तुमचेही पेंटिंग काढतील, असा सल्ला उदयनराजेंनी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांना दिला होता. त्याला प्रत्युत्तर देताना शिवेंद्रराजेंनी उदयनराजेंच्या लोकसभा निवडणुकीतील पराभवाची खपली काढली आहे. तुम्ही इतके लोकप्रिय होता तर लोकसभेला पराभव का झाला, असा सवाल त्यांनी केला.
पेंटिंग काढायचा चंग कार्यकर्त्यांचा : आमदार शिवेंद्रराजे म्हणाले, खासदारांनी कार्यकर्त्यांना वेळीच आवरायला हवे. कार्यकर्त्यांमुळे प्रशासनाला दैनंदिन कामे सोडून कायदा सुव्यवस्थेवर लक्ष द्यावे लागेल, असे कोणतेही कृत्य करू नये. खासदारांचे पेंटिंग एखाद्या त्रयस्त व्यक्ती किंवा यंत्रणेमार्फत काढले गेले असते तर ते समजू शकलो असतो. मात्र खासदाराच्याच गाडीत बसणाऱ्या बगलबच्चांनी त्यांची पेंटिंग काढायचा चंग बांधला. मी कसा लोकप्रिय आहे, याचा नेत्यांनी उदो उदो करायचा हे न समजण्याच्या पलीकडे आहे,
पेंटिंगचा प्रकार म्हणजे बालिशपणा : लोकांच्या विकासकामांना महत्त्व देणे माझ्यासाठी महत्वाचे आहे. कोणी माझे पेंटिंग काढावे यामध्ये मला रस नाही. मतदार संघातील लोकांच्या कामाची पूर्तता करण्यात मला रस आहे. त्यामुळेच सातारा विधानसभा मतदार संघातून बहुतांश वेळा मला प्रतिनिधित्व मिळाले आहे. पेंटिंगचा हा प्रकार बालिशपणा असल्याची टीका शिवेंद्रराजेंनी केली.
लोकांची कामे करून निवडून आलो : मला पेंटिंग काढून घेण्याची हौस नाही. लोकांची कामे केली म्हणूनच मी आमदारकीला निवडून आलो. परंतु लोकप्रिय असताना खासदारकीला तुम्ही पडला. त्यामुळे त्याचे आत्माचित्तन करा. पेटिंग काढण्यापेक्षा लोकांची कामे करा, असा उपरोधिक सल्ला शिवेंद्रराजेंनी खा. उदयनराजे यांना दिला आहे.
हेही वाचा - Sunday Music Street Mumbai : संडे मॉर्निंगसाठी मरीन ड्राईव्ह बनले संगीताचे डेस्टिनेशन; पाहा व्हिडिओ