सातारा - सत्ता विकेंद्रीकरणाचा महात्मा गांधींचा विचार काँग्रेस-राष्ट्रवादीने सांगितला. मात्र, विकेंद्रीकरणाऐवजी त्यांनी सत्तेचं केंद्रीकरण केलं. वर्षानुवर्षे लोकांचा आपल्या सोयीप्रमाणे राजकारणासाठी वापर केला. पृथ्वीराज चव्हाणांनी मुख्यमंत्रीपदावर असताना राज्य सहकारी शिखर बँकेवर प्रशासक नेमला. बँकेत मोठा भ्रष्टाचार असल्याचे सांगितले. मात्र, मुख्यमंत्री असताना जनतेच्या अपेक्षा पूर्ण करू न शकलेले पृथ्वीराज चव्हाण आज भ्रष्ट लोकांच्या संगतीत राहून मतांचा जोगवा मागत आहेत, अशा शब्दांत भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचा समाचार घेतला.
कराड तालुक्यातील विंग गावात झालेल्या महायुतीच्या प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार डॉ. अतुल भोसले, कृष्णा कारखान्याचे चेअरमन सुरेश भोसले, माजी चेअरमन मदनराव मोहिते, कराडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे उपस्थित होत्या.
मला बोलता येत नाही, अशी विरोधक टीका करतात. हे खर आहे. कारण मला त्यांच्यासारखं खोटं बोलता येत नाही असा श्रीनिवास पाटील यांना टोला मारून उदयनराजे म्हणाले, कराडला एवढी पदे मिळाली. मात्र, कराडचा नेमका काय विकास झाला? हा प्रश्न मी स्वतःला विचारला असता विरोधकांनी फक्त पदे मिळविली, असे उत्तर आले. पदे मिळविणे हा विकास नसतो. पदे ही तुम्हाला मिळाली नाहीत, तर लोकशाहीतील राजांनी दिली आहेत, हे लक्षात ठेवा. तरुणांना विकासापासून वंचित ठेवण्याचे पाप काँग्रेस-राष्ट्रवादीने केले असल्याचा आरोपही उदयनराजेंनी केला.
आंतरराष्ट्रीय विषयांवर बोलणारे माजी मुख्यमंत्री आता घसरत-घसरत कराडच्या कृष्णा घाटावर पोहे खाण्यापर्यंत आले असल्याचा टोल मारून डॉ. अतुल भोसले म्हणाले, पृथ्वीराज चव्हाण आता माझी शेवटची निवडणूक आहे. मला मदत करा, अशी भावनिक साद घालतील. ही माझी शेवटची निवडणूक असल्याचे सांगून माईकसमोर रडतील. मात्र, जनतेने भावनिक होऊ नये, असे आवाहन त्यांनी केले.