सातारा - भाजप प्रवेशाबाबत माझ्या मनाला पटेल तो निर्णय मी घेईन. धाकट्या भावाला मदत केलीच पाहिजे. मात्र, रामराजे आणि शिवेंद्रराजे ही मोठी माणसे आहेत. माझी त्यांच्याशी बरोबरी करु नका, असे खासदार छत्रपती उदयनराजे यांनी सांगितले. साताऱ्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तुमच्या भाजप प्रवेशाची चर्चा आहे, असे पत्रकारांनी विचारले तेव्हा चर्चा तर सुरु राहणारच पण काय करायचे याचा विचार मी केलेला नाही. माझ्या मनाला पटेल तोच निर्णय मी घेईन असे उदयनराजे म्हणाले.
तुम्ही आणि रामराजे एकाच दिवशी भाजपत जाणार असल्याच्या चर्चाही रंगल्या आहेत. असे विचारले असता, रामराजे हे राजे आहेत. माझ्यापेक्षा वयाने आणि मानाने मोठे आहेत. त्यांच्याबाबत मी काही बोलणार नाही. मात्र, तुम्ही मला त्यांच्याशी जोडू नका, असेही उदयनराजेंनी सांगितले. उदयनराजे कोणत्याही पक्षात असतील तरीही मला मदत करतील असे शिवेंद्रराजेंनी म्हटले आहे. याबाबत विचारले असता लहान भावाला मदत केलीच पाहिजे. शिवेंद्रराजे तर माझे लाडके बंधू आहेत. त्यांना मदत करणार असेही त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा सातारा जिल्ह्यात येणार आहे. त्यामध्ये तुम्ही सहभागी होणार का? असे विचारले असता यात्रा तर सगळ्याच्या असतात आणि आमची तर जत्रा आहे, असे उत्तर त्यांनी दिले.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीबाबत विचारले असता, उदयनराजे म्हटले की मी फक्त पूरग्रस्तांना मदत करण्याचा एकच विषय समोर ठेवून मुख्यमंत्र्यांना भेटलो होतो. त्या भेटीचा दुसरा काहीही अर्थ काढू नका. मुख्यमंत्र्यांसोबत आणि त्यांच्या पक्षातल्या लोकांसोबत माझी मैत्री आहे, असेही खासदार छत्रपती उदयनराजे यांनी सांगितले.