सातारा - मध्यवर्ती बसस्थानकाजवळील जंबो कोविड सेंटरसमोर दोघा तरुणांना मारहाण करणाऱ्यांना रोखण्यासाठी गेलेली महिला पोलीस जखमी झाली आहे. त्यासंबंधी पाच जणांवर गर्दी जमवने, मारामारी करणे व शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जुन्या वादातून मारहाण
पोलिसांनी सांगितले की, बुधवारी दुपारच्या सुमारास जंबो कोविड सेंटरच्या प्रवेशद्वाराजवळ काहीजण दोन तरुणांना लोखंडी रॉडने मारहाण करत होते. मारहाणीचा प्रकार समजल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हवालदार सुमित्रा डवरे तेथे गेल्या. मारहाण करत असलेल्यांना त्यांनी विचारणा केली. त्यावेळी तो कोरोना बाधीत आहे, परंतु टेस्टला नकार देत आहे, म्हणून पकडून नेत असल्याचे मारहाणकर्त्यांनी सांगितले. त्यावेळी संबंधित तरुण 'मॅडम मला हे मारत आहेत', असे सांगत होता. त्याचवेळी तेथे जवळच दुसऱ्या तरुणाला मारहाण करण्यात येत होती. या मारहाणीत हवालदार डवरे यांच्या हाताला मार बसला. मारहाण करणाऱ्यांपैकी दोघेजण दुचाकीवरुन पळून गेले. जुन्या वादाच्या कारणातून हा प्रकार झाल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक पतंगे तपास करत आहेत. मनोज मिठापूरे, अनिल मिठापुरे, विक्रम मिठापुरे, किरण मिठापुरे आणि अजय मिठापुरे (सर्व रा. मोळाचा ओढा, सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत हवालदार सुमित्रा डवरे यांनी फिर्याद दिली आहे.
हेही वाचा - 'पूर्ण लसीकरण झालेल्यांना मास्कची सक्ती नाही'; अमेरिकेची घोषणा