सातारा : पुणे-सातारा जिल्ह्याच्या सीमारेषेवर असलेल्या शिरवळ आणि लोणंद या दोन शहरांमध्ये सकाळी सहा ते दहा व सायंकाळी पाच ते रात्री नऊ या काळात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. 31 मार्चपर्यंत हे निर्बंध लागू असणार आहेत. खंडाळ्याच्या प्रांताधिकारी मनीषा आव्हाळे यांनी याबाबत आदेश दिले आहेत.
गर्दीच्या वेळात निर्बंध..
खंडाळा तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या वाढू लागल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. प्रांताधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार, खंडाळा तालुक्यात हॉटेल, खाद्यगृहे व दुकानांमध्ये एकूण क्षमतेच्या 50 टक्के नागरिकांना प्रवेश देणे निर्धारित करण्यात आले आहे. कोरोणा संक्रमण रोखण्यासाठी गर्दीच्या वेळेत हे निर्बंध घालण्यात आले आहेत.
दोन टप्प्यात संचारबंदी..
सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी मर्यादा घालण्यात आली असून, सकाळी व संध्याकाळी कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दुकानांमध्ये दोन व्यक्तींमध्ये सहा फुटांचे अंतर बंधनकारक आहे. एक्झिट पॉइंटला थर्मल गन आणि सॅनीटायझरचा व सुरक्षितता म्हणून मास्कचा वापर सक्तीचा करण्यात आला आहे.
31 मार्चपर्यंत बंधने..
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याला पाचशे रुपये दंड करण्यात येणार आहे. या आदेशाचे निर्गमन प्रांताधिकारी श्रीमती आव्हाळे यांनी बुधवारी सायंकाळी केले असून, संचारबंदीचे कठोर पालन सुरू झाले आहे. ही संचारबंदी 31 मार्चपर्यंत लागू राहणार आहे.
प्रतिबंधात्मक उपाय..
शिरवळ, लोणंद ही शहरे पुण्याला जवळ आहेत. महानगराशी स्थानिकांचे नेहमीच दळणवळण चालू असते. त्यामुळे ही शहरे हॉटस्पॉट ठरू नयेत यासाठी ही प्रतिबंधात्मक उपाययोजना केली असल्याचे खंडाळ्याच्या प्रांताधिकारी मनीषा आव्हाळे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले. उन्हाळ्याचे दिवस असल्याने लोक सकाळी तसेच संध्याकाळी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करतात. हे टाळण्यासाठी प्रशासनाकडून ही खबरदारी घेण्यात येत असल्याचे आव्हाळे यांनी स्पष्ट केले. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी दोन्ही शहरातील नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.