सातारा - कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांचा आकडा अडीच हजाराच्या पार गेला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त रूग्णांसाठी कृष्णा हॉस्पिटल हे वरदान ठरले आहे. आतापर्यंत 2 हजार 529 रूग्ण कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे कोरोनामुक्तीच्या लढ्यातील कृष्णा हॉस्पिटलच्या वैद्यकीय सेवेचे कौतुक होत आहे.
कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा हॉस्पिटलने कोरोनामुक्तीच्या लढ्यात महत्वाचे योगदान दिले आहे. कोरोनाग्रस्त रूग्णांसाठी विशेष कोरोना वॉर्ड सुरू केले. तज्ज्ञ डॉक्टर्स, प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ कोरोना वॉर्डमध्ये सेवा देत आहेत. दिनांक 18 एप्रिलला कृष्णा हॉस्पिटलमधून पहिला कोरोनाग्रस्त रूग्ण कोरोनामुक्त झाला. त्यानंतर आतापर्यंत अडीच हजाराहून अधिक रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
अभिमत विद्यापीठाचे प्रभारी कुलपती डॉ. प्रवीण शिनगारे, कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे, सहाय्यक कुलसचिव एस. ए. माशाळकर, कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, डॉ. व्ही. सी. पाटील, डॉ. संजय पाटील, रोहिणी बाबर, राजेंद्र संदे, योगेश कुलकर्णी यांच्यासह तज्ज्ञांचे पथक विशेष कोरोना वॉर्डमधील रूग्णांच्या उपचारासाठी अविरत कार्यरत आहे. कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी कोरोनाच्या चाचण्यांसाठी स्वतंत्र ओपीडी सुरू केली. तसेच अत्याधुनिक मशिन्स उपलब्ध करून संशोधनही सुरू केले आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील कोरोना रूग्णांसाठी कृष्णा हॉस्पिटल वरदान ठरत आहे. कोरोना प्रतिबंधक लसी संदर्भातील संशोधनासाठीही कृष्णा हॉस्पिटलची निवड झाली आहे.