सातारा - अजिंक्यताऱ्यावर, मंगळाई मंदिराच्या बाजूस वाघर लावून सशाची शिकार करणाऱ्या साताऱ्यातील दोघांना वनाधिकाऱ्यांनी अटक केली. जखमी सशाला उपचार करुन नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. महेश आप्पाराव सोवळकर (वय 29, रा. गोळीबार मैदान) व जगन्नाथ रामचंद्र निंबाळकर (वय 50 रा. विलासपूर) अशी संशयितांची नावे आहेत.
गुरुवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास वनक्षेत्रपाल शीतल राठोड यांना अजिंक्यताऱ्यावर शिकारीसाठी संशयित फिरत असल्याची माहिती मिळाली. त्या तत्काळ आपल्या सहकारी टीमसह शाहूनगरमध्ये पोहचल्या. मंगळाई मंदिराच्या पायथ्याशी अंधारात दोन बॅटरी चमकताना दिसल्या. वन कर्मचारी बॅटरीच्या दिशेने गेले असता दोन ते तीन लोक अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले.
नंतर आमराईजवळ, दक्षिणेकडे वनहद्दीलगत दोन व्यक्ती संशयास्पद हालचाली करत असताना दिसून आल्या. अधिक चौकशी केली असता त्यांनी डोंगरात लावलेल्या नायलॉनच्या दोन जाळ्या दाखविल्या. पैकी एका जाळीत एक ससा जखमी अवस्थेत सापडला. वनाधिका-यांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना प्रत्येकी 15 हजार रुपयांचा बाॅड देण्याचे आदेश दिले. ही कारवाई शीतल राठोड, वनपाल सुहास भोसले, वनपाल योगेश गावित, वनरक्षक संजय धोंडवड, प्रशांत पडवळ, संतोष काळे, मारुती माने,राजकुमार मोसलगी, रणजित काकडे, धनंजय लादे, संतोष दळवी यांनी केली.