सातारा : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २० हजाराची लाच स्वीकारताना कराड प्रांताधिकारी कार्यालयाच्या भूसंपादन विभागातील दोन कंत्राटी लिपिकांना रंगेहात पकडले. भूसंपादन मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण करण्याकरिता २० हजाराची लाच कराड प्रांताधिकारी कार्यालयाच्या भूसंपादन विभागातील दोन कंत्राटी लिपिकांना मागीतली होती. रामचंद्र श्रीरंग पाटील, दिनकर रामचंद्र ठोंबरे अशी लाच स्वीकारणाऱ्या लिपीकांची नावे आहेत.
शेतकरी संघटनेच्या अध्यक्षाकडेच लाचेची मागणी : तक्रारदार हे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आहेत. त्यांनी भूसंपादनाच्या प्रक्रियेचा शासकीय कार्यालयांमध्ये पाठपुरावा करण्यासाठी येरवळे (ता. कराड) गावातील नऊ शेतकऱ्यांकडून प्रतिज्ञापत्र घेतलेले आहे. तक्रारदार हे कराड प्रांत कार्यालयात मूल्यांकन प्रक्रियेच्या पाठपुराव्यासाठी गेले असता दोन कंत्राटी लिपिकांनी प्रत्येकी १० हजार रुपये लाचेची मागणी केली.
लाच मागितल्याची दोनवेळा पडताळणी : लाच मागितल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दि. १६ आणि १७ मे रोजी पडताळणी केली. त्यामध्ये दोन्ही लिपिकांनी लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर आज (शुक्रवारी) पोलीस निरीक्षक विक्रम पवार, सहायक फौजदार, शंकर सावंत, पोलीस नाईक नीलेश राजपूरे, विक्रमसिंह कणसे यांच्या पथकाने सापळा रचून २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना कंत्राटी लिपिकांना रंगेहाथ पकडले.
सेवाकाळात वाचले, कंत्राटी काळात सापडले : रामचंद्र पाटील आणि दिनकर ठोंबरे हे कराड प्रांत कार्यालयातील भूसंपादन विभागात दीर्घकाळ कार्यरत होते. भूसंपादन आणि पुनर्वसनाच्या प्रशासकीय कामाचा दोन्ही लिपिकांना दीर्घ अनुभव होता. त्यामुळे सेवानिवृत्तीनंतर पाटील आणि ठोंबरे यांना कंत्राटी लिपिक म्हणून कामावर घेण्यात आले होते.
पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गौरव, पोलीस उपअधीक्षक उज्ज्वल वैद्य, पोलिस निरीक्षक विक्रम पवार, सहायक पोलिस उपनिरीक्षक शंकर सावंत, पोलिस नाईक नीलेश राजपुरे, पोलिस अधिकारी विक्रमसिंह कणसे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
हेही वाचा -