सातारा - मिनी काश्मीर म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वरमध्ये मुख्यमंत्री उद्भव ठाकरे तीन दिवसांच्या खासगी दौर्यावर आले आहेत. त्यांच्या दौऱ्यासाठी महाबळेश्वरमधील वेण्णालेक परिसरात हॅलिपॅड बनविण्यात आले असून मोठा पोलीस बंदोबस्त या परिसरात ठेवण्यात आला आहे. या परिसरात हॅलिपॅड बनवण्याचे काम सुरू असल्याने परिसरातील दुकाने बंद ठेवण्यात आली होती. या परिसरात पर्यटकाना बंदी असल्यामुळे पर्यटकांमध्ये नाराजी पाहायला मिळाली.
महाबळेश्वरमध्ये मुख्यमंत्री यांचे स्वागत मंत्री शंभूराजे देसाई व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मकरंद पाटील यांनी केले. मुख्यमंत्री तीन दिवस सहकुटुंब महाबळेश्वर येथील राजभवन येथे वास्तव्य करणार आहेत. या दरम्यान महाबळेश्वर येथील एका लग्नसोहळ्याला ते उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्र्यांचा हा पूर्ण खासगी दौरा असून राजकीय व्यक्ती आणि मीडियाला भेटण्यास मज्जाव करण्यात आला आहे. महाबळेश्वरमध्ये मुख्यमंत्री येणार असल्यामुळे वेण्णा लेक, घोडा रपेट मैदान पूर्ण बंद ठेवण्यात आले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे प्रशासनाची तारांबळ -
मुख्यमंत्री सातारा जिल्ह्यात प्रथमच खासगी दौर्यावर येत असल्यामुळे जिल्हा प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडालेली पाहायला मिळाली. पर्यटकांना देखील प्रशासनाचा चांगला अनुभव आला आहे. त्याचे कारण देखील तसे आहे. वेण्णालेक परिसरात हेलिपॅड बनवायचे काम सुरू असल्यामुळे आज या परिसरात शुकशुकाट दिसत होता.