सातारा - बुधवारी रात्री उशिरा हाती आलेल्या वृत्तानुसार जिल्ह्यात 135 रुग्ण कोरोनाबाधित निष्पन्न झाले आहेत. यामुळे बाधितांची एकूण संख्या 3 हजार 661 झाली असून 1600 हून अधिक रुग्ण उपचार घेत आहेत. उपचारादरम्यान 6 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
135 बाधितांमध्ये कराड शहरासह तालुक्यातील तब्बल 72 रुग्णांचा समावेश आहे. जिल्हा प्रशासनाने गेल्या काही दिवसात कोरोना संशयितांचे नमूने घेण्याचे प्रमाण वाढवले आहे. त्यामुळे बाधितांची संख्या वाढली आहे. कालपर्यंत 500-550 संशयितांचे स्वाॅब घेण्यात येत होते. बुधवारी दिवसभरात तब्बल 834 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले. चाचणीची संख्या वाढविल्याने रुग्णांची संख्या वाढणार आहे. तथापि नागरिकांनी घाबरुन न जाता स्वत:ची व स्वत:च्या कुटुंबाची काळजी घ्यावी. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.
जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 68 नागरिकांना दहा दिवसानंतर घरी सोडण्यात आले. एकूण 834 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले असल्याचे डाॅ. गडीकर यांनी सांगितले.
उपचारादरम्यात 6 जणांचा मृत्यू
गेल्या 24 तासात उपचारादरम्यात 6 जणांचा मृत्य झाला. मृतांमध्ये कराड तालुक्यातील रेठरे बु. व गुरुवार पेठ, जावली तालुक्यातील सायगांव व भुतेघर, कोरेगांव तालुक्यातील वाठार व कोयानानगर (ता. पाटण) येथील बाधित अशा सहा जणांचा समावेश आहे.
सातारा जिल्हा कोरोना अपडेट
* घेतलेले एकूण नमुने - 27346
* एकूण बाधित - 3661
* घरी सोडण्यात आलेले - 1933
* मृत्यू - 129
उपचारार्थ रुग्ण - 1599