सातारा - जिल्ह्यातील लोणंद येथील एव्हरेस्टवीर व अनेक रेकॉर्ड पादाक्रांत केलेले प्राजित परदेशी यांनी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मालवनच्या दांडी बीचच्या समुद्रात, सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ तीन बोटींच्या मदतीने अंदाजे 400 फुट लांब खाद्यरंग व मत्स्य खाद्य वापरुन भारताचा तिरंगा बनवून अनोखी सलामी दिली.
पाण्यात 400 फुट लांबीचा तिरंगा
ज्या पध्दतीने वायुसेनेचे जवान हवेत विमानाच्या मदतीने धुर सोडुन हवेत तिरंगा निर्माण करून सलामी देतात. याच पध्दतीची सलामी या अवलियानी समुद्रातील पाण्यामध्ये दिली. देशाचा 400 फुट लांब एवढा मोठा तिरंगा पाण्यामध्ये तयार करण्याची बहुदा पहिलीच वेळ असावी. यावेळी भारत माता की जय, वंदे मातरमच्या जयघोषाने मालवणचा समुद्रकिनारा दुमदुमुन गेला होता.
अनेकांचे सहकार्य
प्राजित परदेशी यांची संकल्पना पूर्णत्वास नेण्यासाठी अॅडव्हेचर फोटोग्राफर मेहुल ढवळे, वनरक्षक विश्वास मीसाळ, राहुल परदेशी व मालवण येथील अन्वय अंडरवॉटर सर्व्हिसेसचे रूपेश प्रभू, अन्वय प्रभू, सुमंत लोणे, राजू परब, राशमीन रोगे, नारायण रोगे यांचे सहकार्य लाभले. त्यांनी तीन बोटींद्वारे सुमारे तीन किलोमिटर आत समुद्रात गेल्यानंतर सुमारे 400 फुट लांब तिरंगा निसर्गपुरक खाद्यरंग व मत्स्य खाद्य वापरुन साकारला. भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त एक आगळी वेगळी सलामी देण्यात आली.
अभिनव उपक्रमात लोणंदची आघाडी
यापूर्वीही प्राजित परदेशी व त्यांच्या सहकाऱ्यांनी 15 ऑगस्ट 2019 रोजी 321 फुटाची भव्य तिरंगा रॅली लोणंदमध्ये काढली होती. मागील वर्षी सिंहगडावर 350 फूट भगवी रॅली काढून तानाजी मालुसरे यांना आदरांजली वाहण्यात आली होती तर तीन महिन्यांपूर्वी कळसुबाई शिखरावर तिरंगा ध्वजच्या माध्यमातून महाराष्ट्राचा नकाशा काढण्यात आला होता. मागील महिन्यात मालवण समुद्रामध्ये 321 फूट तिरंगा फडकवला होता.
हेही वाचा - प्रजासत्ताक दिन विशेष: संविधान निर्मितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान