सातारा - पाटण शहरात कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढत असलेली रुग्ण संख्या व धक्कादायक मृत्यूदर लक्षात घेता कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आज पासून 19 ऑगस्ट पर्यंत पाटण शहरात कडकडीत लॉकडाउनचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे. यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन पाटण नगरपंचायत नगराध्यक्ष संजय चव्हाण व उप-नगराध्यक्ष सचिन कुंभार यांनी एका पत्रकाद्वारे प्रसिद्धीस दिले.
पाटण नगरपंचायत पदाधिकारी व अधिकारी यांची येथील तहसील कार्यालयात बैठक झाली. यावेळी उप विभागीय अधिकारी श्रीरंग तांबे, नगराध्यक्ष संजय चव्हाण, उप नगराध्यक्ष सचिन कुंभार, मुख्याधिकारी अभिषेक परदेशी आदी मान्यवर अधिकारी, पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. याच बैठकीत हा लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला.
पाटण शहरात यापूर्वी कोरोनाचा शिरकाव होऊ दिला नाही. परंतु दुर्दैवाने गेल्या काही दिवसांत येथे झपाट्याने कोरोना रूग्णांची संख्या वाढतच चालली आहे. तर मृत्यूदरही सर्वाधिक आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर कोरोनाची साखळी तोडून शहरवासियांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी 19 ऑगस्टपर्यंत पाटण शहरात कडक लॉकडाउन केला जाणार आहे. यात केवळ औषधे व किराणा साहित्य यांना फक्त घरपोच सेवा पुरविता येणार आहेत. तर राष्ट्रीयकृत वगळता स्थानिक बँका, पतसंस्था, सेतू कार्यालय, स्टॅम्पव्हेंडर संघटना आदीही या लॉकडाउनमध्ये सहभागी होणार आहेत. त्यामुळे अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली होणारा वावरही बंद झाला आहे. याचीही तर कायदेशीर बाबींचे, नियम, निर्बंध यांचे उल्लंघन केल्यास संबधितांवर त्या त्या विभागांकडून कडक कायदेशीर कारवाया, दंड आकारण्यात येणार आहेत.