कराड (सातारा) - पुणे-बंगळुरू महामार्गावर कराड तालुक्यातील शिवडे गावच्या हद्दीत रविवारी दोन कंटेनरच्या भीषण अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक बराच काळ ठप्प झाली होती. तसेच ऑईल सांडल्याने महामार्ग निसरडा झाला होता. पोलिसांनी अपघातग्रस्त कंटेनर महामार्गावरून बाजूला करून ऑईल सांडलेल्या ठिकाणी माती टाकल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली.
सातार्याहून कराडकडे निघालेल्या कंटेनर चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव कंटेनर (क्र. एम. एच. 43 बी. जी. 1952) महामार्गाच्या डिव्हायडरला धडकून विरूद्ध बाजूच्या लेनवर जाऊन सातार्याकडून कराडकडे निघालेल्या कंटेनरला (क्र. टी. एन. 39 सी. झेड. 8340) भीषण धडक दिली. या अपघातात दोन्ही कंटेनर चालकांसह अन्य एक जण, असे तिघेजण गंभीररित्या जखमी झाले.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांसह उंब्रज पोलीस ठाण्याचे कर्मचारी, महामार्ग पोलीस आणि महामार्ग देखभाल विभागाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने मदत कार्यास सुरुवात करून जखमींना कराड येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. अपघातात कंटेनरचे ऑईल महामार्गावर सांडल्यामुळे महामार्ग निसरडा झाला होता. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक सुमारे तासभर ठप्प होती. पोलिसांनी प्रथम क्रेनच्या साह्याने अपघातग्रस्त वाहने महामार्गावरून बाजूला करून ऑईल सांडलेल्या ठिकाणी माती टाकली. त्यानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली. उंब्रज पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून अपघाताचा गुन्हा नोंद केला आहे.