कराड (सातारा) - कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या कराडमध्ये एका दहा महिन्याच्या बाळासह तिघांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. कोरोनामुक्त झालेल्या या तिघांनाही आज घरी सोडण्यात येत आहे. आतापर्यंत कराडमध्ये चार रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
हेही वाचा... कोरोनावर 'औषध' म्हणून पिली दारू; विषबाधेमुळे ७०० नागरिकांचा मृत्यू..
एकाच दिवशी (दि. १५ एप्रिल) सातारा जिल्ह्यात 4 जण कोरोनाबाधित आढळले होते. त्यातील तिघेजण कोरोनामुक्त झाले आहेत. पाटण तालुक्यातील दहा महिन्याच्या बाळाने देखील कोरोनावर मात केली आहे. त्याचे १४ आणि १५ दिवसांचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे या बाळाला देखील आज घरी सोडण्यात येणार आहे.
कराड तालुक्यातील एक रूग्ण हा जिल्ह्यातील पहिला कोरोना बळी ठरला होता. त्याच्या 73 वर्ष वयाच्या आईलाही कोरोनाची लागण झाली होती. मात्र, या महिलेने कोरोनावर मात केली आहे. त्यांनाही आजच घरी सोडण्यात येणार आहे. त्याचबरोबर मूळ बिहार येथील रहिवासी आणि कराडच्या रेल्वे स्टेशनमधील कर्मचारीही कोरोनामुक्त झाला आहे. या तिनही रूग्णांनी कोरोनावर मात करत कराडसह सातारा जिल्ह्याला सुखद धक्का दिला आहे.