सातारा - जिल्ह्यातील 16 शाळांमधील 35 विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची धक्कादायक माहितीपुढे आली आहे. या शाळा बंद करुन निर्जंतुक करण्याचे आदेश देण्यात आले असून तालुका स्तरावर 40 पथके तपासणीसाठी स्थापन करण्यात आली आहेत. कोरोनाचा शिरकाव झाल्याने सर्वच शाळांसाठी ही धोक्याची घंटा ठरली आहे.
पालक धास्तावले
जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे यांनी याबाबतची आकडेवारी दिली. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी जारी केली आहे. मास्क न वापरणार्यांवर दंडात्मक कारवाईचा धडाका सुरू झाला आहे. विवाह समारंभ, उत्सव आदींवर करडी नजर ठेवली जात आहे. यातून जिल्ह्यात कोरोनाचे मागीलप्रमाणे धीरगंभीर वातावरण तयार झाले आहे. त्याचवेळी शाळांमध्ये कोरोनाने प्रवेश केल्याने शैक्षणिक क्षेत्रासह सर्वांचेच धाबे दणाणले आहेत. शाळेतील विद्यार्थांना कोरोनाची लागण होत असल्याने पालक वर्ग धास्तावला आहे.
पुसेगावात 26 विद्यार्थ्यांना बाधा
जिल्ह्यात एकूण 830 शाळा असून त्यापैकी जवळपास 800 शाळा सुरू आहेत. या शाळांमध्ये जवळपास 55 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती आहे. पण, आता कोरोना संकटापासून आजपर्यंत दूर असणार्या विद्यार्थ्यांनाही आता कोरोना संसर्गाचा फटका बसल्याने जिल्ह्यात चिंतेचे वातावरण आहे. पुसेगाव येथील सेवागिरी विद्यालयातील सर्वाधिक 26 विद्यार्थी पॉझिटिव्ह आले आहेत. या शाळांची तपासणी आरोग्य विभागातर्फे सुरू करण्यात आली असून कोरोनाबाधित विद्यार्थी आढळलेल्या शाळा तत्काळ बंद करण्यात आल्या असल्याचे शिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे यांनी सांगितले.
शाळांतून तपासणी
जिल्हापरिषदेच्या 16 शाळांमधील 35 विद्यार्थी हे कोरोनाबाधित सापडले असून या शाळांमधील सर्व विद्यार्थांची कोरोना तपासणी आता टप्या-टप्याने केली जाणार आहे. पाचवी ते आठवीच्या वर्गातील 25 विद्यार्थी कोरोनाबाधित आढळले असून 9 ते 12 च्या वर्गातील 10 विद्यार्थी कोरोनाबाधित झाल्याचे तपासणीत समोर आले आहे. या सर्वांवर वेळेत उपचार सुरू करण्यात आले. मात्र, इतरही सर्व विद्यार्थांची तपासणी सुरू असल्याचेही शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा
शाळांच्या तपासणीसाठी तालुकास्तरावर 40 पथके नेमली असून तपासणी सुरू झाल्याचे शिक्षणाधिकारी खंदारे यांनी सांगितले. शाळांनी 'एसओपी'चे पालन न केल्यास त्यांची जबाबदारी शाळा व्यवस्थापनावर असेल, असा इशारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिला आहे.
हेही वाचा - संजय राठोड दर्शनासाठी येणार म्हणून गर्दी झाली; गृहराज्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण